
नांदेड| जागतिक महिला दिनी मागील तेरा वर्षापासून सातत्याने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार्या सोहळ्यात राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार लातूरच्या संगीता माळवणे यांना तर कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार पैठणच्या सुनिता कुलकर्णी यांना जाहीर झाला असून मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या संबंधी लवकरच तारीख कळवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य संयोजक व मुख्य संपादक रूपेश पाडमुख तथा रामेश्वर धुमाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

जागतिक महिला दिनी मीमांसा फाऊंडेशन, दै.समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व मिडीया पोलीस सोशल क्लबच्यावतीने दरवर्षी आपल्या कार्यातून चमक दाखवणार्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाचे हे चौदावे वर्ष आहे.यावर्षी मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यासह प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेऊन गरजूंना मदत करून नावलौकीक मिळवणार्या लातूरच्या श्रीमती संगीता माळवणे यांना राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार तर पैठणच्या रहिवासी असणार्या संगीता कुलकर्णी ज्यांनी पैठणी साड्यांचे अनेक दालन उघडून अनेकांना व्यवसायाभिमुख करून आपल्या पायावर उभे करण्याचे बळ दिले त्यांना कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे राहणार्या सौ.उज्वला तांभाळे पाटील यांनी राजकीय प्रवास करत असताना गरीबांची सेवा करण्यासह शिक्षण घेणार्यांना होतकरूंना मदतीचा हात देत सातत्याने सेवा करत असल्याने त्यांना सावित्रीबाई फुले शिक्षण भूषण पुरस्कार, फळ प्रक्रिया व कृषी प्रक्रियेतून उद्योजक बनून इतरांसाठी मार्गदर्शक ठरलेल्या जालना जिल्ह्यातील मंठा येथील सिताबाई मोहिते यांना अहिल्याबाई होळकर समाजसेवा पुरस्कार, भारूडासह लोक संगीतातून प्रबोधनाचे कार्य करणार्या तुळजापुरच्या कृष्णाई उळेकर यांना फातीमा शेख स्मृती पुरस्कार, घटस्फोटीत महिलांना जगण्याचा मार्गासह तरूण-तरूणींना मार्गदर्शन करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणार्या परभणीच्या निर्मला जाधव यांना रमाबाई आंबेडकर प्रेरणादायी पुरस्कार, जनतेमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार्या माजलगावच्या संध्या भांडेकर यांना इंदिरा गांधी आयर्न लेडी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सदरील पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा विशेष सन्मान करण्यात येतो. त्यात यशवंत महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.चित्रा वानखेडे, भजनातून धार्मीक संदेश देणार्या संध्या छपरवाल, समाजसेवेत अग्रेसर ताराबाई कटकमवार, करणी सेनेच्या बुलंद आवाज सौ.सुनिता चौहान, उत्कृष्ट आरोग्य सेवीका शंकुतला बनसोडे, महिलांना सातत्याने प्रेरणा देणार्या सूर्यमाला मोतीपवळे, आरोग्य सेवेत अग्रेसर सौ.अंजना गायकवाड, महिलांना कायद्याचे ज्ञान देणार्या पुष्पा बनसोडे, समतादूत म्हणून मागील अनेक वर्षापासून कार्यरत राणी पद्मावती बंडेवार यांच्यासह अगदी बालपणातच आपल्या वाणीने मंत्रमुग्ध करून छाप पाडणार्या किनवट तालुक्यातील चिंचखेड येथील चिमुरड्या कु.गौरी व कु.राधीका विजय चव्हाण यांचाही त्यांना जीवनात अधिक प्रोत्साहन मिळावे म्हणून विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

तरी सदरील सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, सखाराम कुलकर्णी, अरविंद जाधव, ज्ञानोबा पवार, रमेश तिवारी, सुनिल कुलकर्णी, सौ.संगीताताई बारडकर, सौ.उज्वला दर्डा, सौ.अरूणा पुरी, सौ.संध्या सुर्यवंशी, सौ.सविता गबाळे, सौ.प्रणीता भरणे, मो.तनवीर, शिवहारी गाढे तथा संपादक रूपेश पाडमुख यांनी केले आहे.

