नांदेड। काल राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थ संकल्पात सरकारने छपाई माध्यमांतील महत्वाचा घटक असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना वंचितच ठेवले. म्हणजेच राज्यातील लाखो वृत्तपत्र विक्रेत्यांवर अन्यायच केला आहे आणि आत्ताच नाही तर अनेकदा केला आहे असे राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे बालाजी पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील लाखो वृत्तपत्र विक्रेते, ग्रामीण भागातील श्रमिक पत्रकार, पार्सल टाकणारे असे सर्व घटक नाराज असल्याचेही म्हटले आहे.
पुढे बालाजी पवार यांनी स्पष्ट केले की अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात अनेक जातींसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळं स्थापन केली. मात्र तीन कोटी च्या वर असलेल्या असंघटित कामगारांसाठी एकच महामंडळ स्थापन करण्यात येईल असे जाहीर केले आहे. याअगोदर 3 एप्रिल 2018 ला महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन केले होते.
पण त्या महामंडळाला शासनाने आजपर्यंत निधीच दिला नाही अशी माहिती असंघटित कामगार उपायुक्त यांनी आम्हाला एका बैठकीत दिली होती. मग आज आणखी तोच निर्णय डबल का केला आहे हे ही कळलं पाहिजे. असंघटित कामगार क्षेत्रातील कामगारांसाठी वेगवेगळ्या घोषणा करून सरकार बोळवणंच करत असते असाही आरोप बालाजी पवार यांनी केला आहे.
आम्ही अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी वेगवेगळ्या पध्दतीने पाठपुरावा केला आहे. त्याची एक उत्पत्ती म्हणजे राज्य सरकारने वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी योजना अंमलबजावणी करीता अभ्यास समिती 7 मार्च 2019 रोजी गठीत केली होती. त्या समीतीने राज्य सरकारला 17 डिसेंबर 2019 रोजी अहवालंही सादर केला आहे. त्यानंतरही कामगार मंत्रालयात कामगार मंत्र्यासोबत अनेकदा बैठका झाल्या.
गेल्या महिन्यात 1 फेब्रुवारी 2023 रोजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे सोबत ठाण्याचे आमदार संजय केळकर, प्रधान सचिव, असंघटित कामगार आयुक्त, सहायक आयुक्त व कामगार अधिकारी सोबत वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कामगार मंत्र्यांनी लवकरच मालक लोकांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असेही सांगितले होते.
पण याही अर्थ संकल्पात वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाचा निर्णय झालेला नाही याचे दुःख वाटते. कारण असंघटित कामगार वाढत चालले आहेत. तेंव्हा या क्षेत्रातील घटकांसाठी निर्णय घेणे गरजेचे आहे. सरकारने आजपर्यंत अनेक समित्यांची घोषणा केली आहे. पण अंमलबजावणी झालेली दिसत नाही. तेंव्हा महाराष्ट्र राज्य संघटना याविषयी संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर व पदाधिकारी यांचे सोबत महत्वाची बैठक घेऊन सरकारला जागं करण्यासाठी पुढील दिशा ठरवली जाणार आहे असेही बालाजी पवार यांनी सांगितले आहे.