
नांदेड। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे पहिले किनवट तालुका अधिवेशन बोधडी (बु.) येथे दिनांक 11 मार्च रोजी थाटात संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीटूच्या राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून जमसंच्या नांदेड जिल्हा निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड व नांदेड तालुका अध्यक्षा कॉ.लता गायकवाड यांची उपस्थिती होती.

देशातील महिलांची सर्वात मोठी संघटना म्हणून सुपरिचित असलेली अखिल भारतीय जनवादी महिला संघटना नांदेड जिल्ह्यात जोमाने कार्य करीत असून संघटनेने अनेक लक्षवेधी आंदोलने जिल्हाधिकारी कार्यालयावर केली आहेत.

सदर अधिवेशनात नूतन किनवट तालुका कमिटी एकमताने निवडण्यात आली असून अध्यक्षा पदी कॉ.सैलजा आडे तर सचिव पदी कॉ. सुनीता बोनगीर यांची निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष कॉ. कल्पना डांगे,उपाध्यक्ष कॉ. अर्चना काळे,कॉ.सीमा भगत, सह सचिव कॉ.सविता ढोले,कॉ. वमनाला जोंधळे, कॉ.उषा मोहिते आदींची निवड करण्यात आली.कॉ.प्रयागबाई लोखंडे यांच्या क्रांतिकारी गीतांनी अधिवेशनाचा समारोप करण्यात आला.

