
हिंगोली/हिमायतनगर। हदगाव तालुक्यातील वाटेगाव व उमरखेड तालुक्यातील कारखेड दरम्यान पैनगंगा नदीवर मोठा पुल बांधण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांमधून गत अनेक दशका पासुन करण्यात येत होती, याच पुलाच्या मंजुरीसाठी नागरीकांच्या मागणी वरून खासदार हेमंत पाटिल यांनी पाठपुरावा केल्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शिंदे फडणविस सरकारने ५५ कोटी रूपयाच्या निधीस मंजुरी दिल्याने मराठवाडा विदर्भ तेलंगणा राज्याचा दळणवळणाचा मार्ग आनखी मजबुत होणार आहे. यामुळे उमरखेड, महागाव तालुक्यातील बंदी भाग, किनवट, हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील नागरीकांना याचा मोठा लाभ होणार असुन हिमायतनगर हदगाव अंतर ३० किमी होणार आहे.

हदगाव तालुक्यातील वाटेगाव आणि उमरखेड तालुक्यातील कारखेड दरम्यान पैनगंगा नदी वाहते या नदीवर हरडफ बंधारा आहे, पावसाळ्यात नदीला पाणी असतांना खरीपाच्या दरम्यान बंधारा कोंडल्यावर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचुन राहते, परीणामी उमरखेड तालुक्यातील कारखेड, देवसरी, वाटेगाव, खरूस सह पंचक्रोशीतील नागरीकांना लाकडी तराफा व रूकावरून प्रवास करत हदगाव जावे लागते, किंवा पन्नास किंमी चे अंतर कापत विडुळ – उमरखेड मार्गे हदगाव पोहचावे लागते केवळ पैनगंगा नदीवरील पुलामुळे होणारी वाताहत थांबवण्यासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा करून पुलास मंजुरी मिळुन द्यावी अशी मागणी येथील नागरीकांनी केली होती. याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला. पुलास मंजुरी तर मिळालीच त्यासोबत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ५५ कोटी रूपयास मंजुरी देण्यात आली आहे.

याबाबत खासदार हेमंत पाटिल म्हणाले की, हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिमायतनगर हदगांव या जवळच्या रस्त्यावर, कारखेड फाटा ते वाटेगांव दरम्यान पैनगंगा नदीवर पुल होणे आवश्यक होते. सदरील पुल झाल्यास मराठवाडा व विदर्भातील २० ते २५ गावांना प्रवास करण्यासाठी व वाहतूकीसाठी जवळपास ४० कि.मी. चे अंतर कमी होईल. तसेच दवाखाना, शिक्षण, बाजार व ऊस वाहतुकी संदर्भात सर्व अडचणी दुर होवून, मराठवाड्यातील हदगांव व नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यास सोईस्कर होईल. हिमायतनगर हदगाव अंतर जवळगाव मार्गे ४५ किमी आहे, कारखेड – वाटेगाव पुल झाल्या नंतर केवळ ३० कि.मी. हिमायतनगर हदगाव अंतर राहणार आहे, या मार्गावर तेलंगाणा राज्यातील निर्मल, निजामाबाद, म्हैसा, येथुन हदगाव पुढे हिंगोली करीता दळणवळणाची वाहतुक वाढलेली दिसणार आहे.

याचा विचार करून मौजे कारखेड ते वाटेगांव दरम्यान पैनगंगा नदीवर (प्र.जि.मा. – ६२) पुल मंजूर करुन निधी उपलब्ध करून द्यावा, ही बाब मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या निदर्शनास आणून दिली होती, त्यामुळेच या पुलाच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. या भागातील नागरिकांमधून खासदार हेमंत पाटील यांच्या कामाबाबत समधान व्यक्त केले जात आहे.

कारखेड येथे फटाक्याची आतषबाजी – कारखेड वाटेगाव दरम्यान पैनगंगा नदिवरील पुलाच्या निधीस मंजुरी मिळाल्याची बातमी कारखेड पंचक्रोषीतील नागरीकां पर्यंत पोहचताच कारखेड येथिल प्रशस्त हनुमान मंदिरा समोर ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला, खासदार हेमंत पाटिल यांनी सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजुर करून घेतल्या बद्दल त्यांचे आभार मानन्यात आले.

