Tuesday, March 21, 2023
Home लेख छत्रपती संभाजीनगर, धाराशिव व एमआयएम -NNL

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव व एमआयएम -NNL

by nandednewslive
0 comment

भारतावर अनेक वर्षे इंग्रजांची सत्ता होती. इंग्रजांच्या तावडीतून भारत देश १९४७ मध्ये स्वतंत्र झाला . परंतु त्याच्या एक वर्षानंतर १७ सप्टेंबर १९४८ मध्ये मराठवाडा हा स्वतंत्र झाला.त्या काळात मराठवाड्यावर निजामांची सत्ता होती. सध्या असलेला तेलंगणाचा भाग तसेच तेथील राजधानी हैदराबाद , कर्नाटक मधील बिदरपर्यंतचा भाग व मराठवाड्याचा पूर्वीचा उस्मानाबाद ते औरंगाबादपर्यंत निजामांची सत्ता होती.

निजामाच्या तावडीतून मराठवाड्याची सुटका करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवाची आहुती दिली. त्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला. परंतु त्याकाळी मराठवाड्यातील जिल्ह्यांची जी नावे होती तीच नावे फेब्रुवारी २०२३ च्या अखेरपर्यंत शासन दरबारी देखील होती. मुघलांच्या काळात छत्रपती संभाजीनगरचे नाव ‘खडकी ‘असे होते. परंतु त्यानंतर निजामांनी ‘खडकी’ हे नाव बदलून औरंगाबाद असे केले होते. व सध्याच्या भाजप सरकारने निजामाच्या काळातील औरंगाबाद हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे केले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जेव्हा भाजपसोबत होती त्यावेळी त्यांनी देखील औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी संमती दिली होती.

परंतु राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत गेल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने मात्र त्या विषयावर चुप्पी साधली होती.उत्तर प्रदेशमध्ये देखील मुस्लिम राजांच्या नावावरून असलेल्या गावांची नावे अलीकडेच बदलण्यात आली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील भाजपची सत्ता आल्याबरोबर जिल्ह्यांच्या नावांमध्ये बदल करण्यात आला. यासाठी भाजपची नेते तसेच केंद्रातील भाजप सरकार यांनी खूप मोठी हिम्मत दाखविल्यामुळे औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे करण्यात आले. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करावे , अशी गेल्या कित्येक वर्षांची मागणी आता पूर्णत्वास आली आहे.

याचबरोबर उस्मानाबाद हे देखील मुस्लिम राजांच्या नावावर असलेले नाव पूर्णपणे बदलून आता ‘धाराशिव ‘असे झाले आहे. या दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलण्यास राज्य सरकार व केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यामुळे मराठवाड्यातील या दोन्ही जिल्ह्यातच नव्हे तर इतर जिल्ह्यांमध्ये देखील या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी छत्रपती संभाजीनगर तसेच धाराशिव या नामांतराचे फटाके फोडून, जल्लोष करून स्वागत केले. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यामुळे तेलंगणामधील ‘एम आय एम ‘या पक्षाने मात्र जोरदार आक्षेप घेतला आहे .छत्रपती संभाजीनगर येथील ‘एम आय एम’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू केले आहे. औरंगाबादचे नाव बदलण्याला ‘एमआयएम ‘ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचाही विरोध असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांचे म्हणणे आहे. तसेच या आंदोलनात ‘एमआयएम’ सोबत हे दोन्ही पक्ष सहभागी होत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले आहे.

banner

मराठवाड्यातील जनतेने राज्य सरकार व केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केलेले असताना एका लोकप्रतिनिधीने यास विरोध करणे म्हणजे घटनाबाह्य असल्याचे मत काही राजकीय पुढार्‍यांनी व्यक्त केले आहे. राज्य व केंद्र सरकारने औरंगाबाद व उस्मानाबादचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणहून सुटणाऱ्या एसटी बसेसच्या पाट्या बदलण्याचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यातील बस स्थानकात जाऊन छत्रपती संभाजी नगर व धाराशिव येथून सुटणाऱ्या गाड्या तसेच बसवर लावण्यात येणाऱ्या पाट्या यावरील नाव बदलून टाकले आहे. एम आय एम पक्षाचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केवळ मुस्लिम मतदारांची भावना राखण्यासाठी या नावाला विरोध दर्शविला आहे. यानंतरच्या निवडणुकीत मात्र मतांचे ध्रुवीकरण पहावयास मिळेल , असाही अंदाज बांधला जात आहे.

विखुरलेली हिंदुत्ववादी मते मात्र यामुळे नक्कीच भाजपच्या पारड्यात जातील अशी दाट शक्यता आहे.औरंगाबादचे नाव बदलण्याचा मुद्दा हा अलीकडच्या काळातील नाही .गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबादचे नाव बदलण्याबाबत शासन दरबारी चर्चा झाली होती. परंतु सत्तेवर असणारे सत्ताधारी यासाठी पुढाकार घेत नव्हते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात हा निर्णय झाल्याने संपूर्ण मराठवाड्यात याबद्दल जल्लोष आहे. तसेच केंद्र सरकारने देखील यास तत्काळ मंजुरी दिल्याने मराठवाड्यात नरेंद्र मोदी यांचा जयजयकार होत आहे.

…..डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा वार्तापत्र, abhaydandage@gmail.com

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!