
नांदेड| इयत्ता पाचवी ते आठवीला शिकणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांची सहल इस्त्रो अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा येथे नियोजित आहे. यासाठी जिल्हास्तरावरील विद्यार्थी निवडीची परीक्षा येथील गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये घेण्यात आली. 167 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.

प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी परीक्षा केंद्रास भेट देऊन परीक्षा स्थळीच्या संपूर्ण नियोजनाची पाहणी केली. सहाय्यक गट विकास माधव केंद्रे, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, डायटचे अधिव्याख्याता महेश चिटकुलवार, शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण पाठक, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, डॉ. प्रज्ञानकुमार भोजनकर, प्रलोभ कुलकर्णी, आर.जी. कुलकर्णी, बी.डी. जाधव, संजय भालके, गणेश शिंदे यांनी नियोजनाची भूमिका बजावली. सविता अवातिरक, अर्चना बागवाले, शशिकला दावगरवार, मीनल देशमुख, प्रकाश गोडणारे, सुरेखा सुरेकर, सतीश गीते, यांनी पर्यवेक्षण केले.

येत्या 28 मार्च रोजी 48 विद्यार्थ्यांची सहल इस्रो श्रीहरीकोटा येथे जाणार असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी विद्यार्थ्यांची संशोधन दृष्टी वाढीस लागावी यासाठी जिल्हाभरात वेगवेगळे उपक्रम आयोजित केले आहेत. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम असून केंद्रस्तरावर 28 फेब्रुवारी रोजी व तालुकास्तर स्तरावर 3 मार्च रोजी विद्यार्थी निवडीच्या परीक्षा संपन्न झाल्या.

त्यानंतर तालुकास्तरावर गुणांकन मिळविलेले प्रत्येकी 10 विद्यार्थी याप्रमाणे 167 विद्यार्थ्यांची निवड परीक्षा आज गुरुकुल इंग्लिश स्कूल वजीराबाद नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. शाळेच्या प्राचार्या वैशाली कुलकर्णी यांनी परीक्षेसाठी शाळेचे हॉल्स आणि आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून दिली. प्रकाश कुलकर्णी आणि रुपाली कुलकर्णी यांनी नियोजनात मदत केली. 100% विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

