नांदेड। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून किनवट तालुक्यातील आशा व गटप्रर्वतक ताईंचा तालुका मेळावा दिनांक 12 मार्च रोजी पंचायत समिती सभागृह किनवट येथे थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीटूच्या राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी मा.संगीताताई चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या मा.करुणाताई आळने यांची उपस्थिती होती. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा फेडरेशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. मेळाव्याला शुभेच्छा देण्यासाठी आशा व गटप्रर्तकांचे तालुका समन्वयक आदरणीय जनार्दन काकडे सिटू चे जिल्हा कमिटी सदस्य कॉ.जनार्दन काळे हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कार्याध्यक्ष निर्मलाताई जोंधळे यांनी केले.
मेळाव्याचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सुनीताताई पाटील यांनी केले. मेळाव्याला मार्गदर्शन आशा गटप्रर्वतकं फेडरेशनच्या उपाध्यक्ष व तालुका सचिव शीलाताई ठाकूर यांनी केले. अध्यक्षीयसमारोपात कॉ.उज्वला पडलवार यांनी महिला सबलीकरण तसेच महिलांबाबतचे कायदे नुसते कागदावरच असून आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत महिला सुरक्षित नाहीत,आरोग्य खात्यात काम करणाऱ्या आशा वर्कर व गटप्रर्वतकं या मुख्यतः महिला वर्ग असून त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते हे शोकांतिका आहे.पुढची लढाई मजबूत करून लढावे लागेल असे मत व्यक्त केले.मेळावा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व आशा वर्कर ताई व गटप्रर्वतकांनी पुढाकार घेतला आभार प्रदर्शन सुनीताताई पाटील यांनी केले.