
मुखेड। राज्य संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर वाघमारे,कार्यकारी अध्यक्ष विश्वनाथ घुगे व संघटक वैजनाथ स्वामी व सतीश देशमुख,राज्य उपाध्यक्ष तथा मराठावाडा अध्यक्ष मारोतराव गायकवाड यांच्या आवाहनानुसार नांदेड जिल्हयातील नगरपालिका व नगर पंचायत व संवर्ग कर्मचारी यांनी 14 मार्चपासून होणा-या संपात सहभागी व्हावे असे आवाहन म.रा.नपा कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभिम शेंडगे यांनी केले आहे.

राज्यातील नगर पालिका,नगर पंचायत मधील सर्व कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांसोबतच जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी. राज्यातील नगर पालिका,नगर पंचायत मधील सर्व कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांप्रमाणे सेवार्थ आयडी लागू करुन 100 टक्के वेतन व सेवानिवृत्ती वेतन शासनामार्फत शासकीय कोषागारामार्फत देण्यात यावे. राज्यातील नगर पंचायत मधील उद्घोषणेनंतरचे व पुर्वीचे राहिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे विनाअट समावेशन करणे, ईतर कर्मचाऱ्यांप्रमाणे 10,20,30 आश्वासित प्रगती योजना लागू करावी. नगर परिषदेमधील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचा-यांना तात्काळ पदोन्नती देण्यात यावी.

नगर परिषदेमधील वरिष्ठ लिपीक यांना उपमुख्यअधिकारी पदावर पदोन्नती देण्यात यावी आदी मागण्या अनेक वर्षापासून शासन दरबारी मांडल्या जातात. परंतू या मागण्यांचा विचार न झाल्यामुळे नाईलाजास्तव संपावर जावे लागत आहे. तेंव्हा नांदेड जिल्हयातील सर्व न.प.कर्मचा-यांनी या संपात सहभागी होवून आपली शक्ती दाखवावी असे आवाहन म.रा.नपा कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभिम शेंडगे,जिल्हा उपाध्यक्ष लालू सोनकांबळे, जिल्हा सेक्रेटरी जितेंद्र ठेवरे यांनी केले आहे.

