प्रस्तावना : हिंदु धर्मामध्ये 16 संस्कार सांगितले गेले आहेत. विवाहसंस्कार हा या 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार आहे. विवाहसंस्कार हा गृहस्थाश्रमाचा आरंभबिंदु म्हणता येईल. विवाह संस्कारामुळे कुटुंबव्यवस्था टिकून राहून पर्यायाने समाजव्यवस्था आणि राष्ट्रव्यवस्था उत्तम रहाते. आज विवाहसंस्थेत अनेक चुकीच्या प्रथा शिरल्या आहेत. स्वैराचार-स्वातंत्र्य यांच्या अतिरेकी आग्रहामुळे तडजोड, सामंजस्य, एकमेकांना समजून घेणे आदी सूत्रांकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, वैवाहिक जीवनात, तसेच कुटुंबजीवनात ताण-तणाव निर्माण होण्यासह घटस्फोटांचे प्रमाणही वाढत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर पाश्चात्त्य देशांसारखी भारताचीही दूरवस्था होऊ शकते. यासाठी विवाहसंस्था टिकवण्याची आवश्यकता आहे. विवाहसंस्थेचे महत्त्व, यामध्ये शिरलेल्या अपप्रवृत्ती आणि विवाहसंस्था टिकवण्यासाठी करायचे प्रयत्न याविषयी प्रस्तुत लेखात उहापोह केला आहे.
1. विवाहसंस्काराचे महत्त्व आणि उद्देश : हिंदु धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यांपैकी ‘काम’ हा पुरुषार्थ साध्य करून हळूहळू ‘मोक्ष’ या पुरुषार्थाकडे जाता यावे, यासाठी विवाहसंस्काराचे प्रयोजन आहे. हिंदूंच्या विवाहाचे हेतू सुप्रजा निर्माण करणे, धर्म आणि संस्कृती यांचे चिरंजिवित्व राखणे, मानवाचे ऐहिक हित साधणे आणि आध्यात्मिक समाधान प्राप्त करून घेणे, हे आहेत. हिंदु संस्कृतीनुसार विवाह हा करार नसून ईश्वराने निर्माण केलेला संस्कार आहे.
विवाहामुळे समाज सदाचारी होतो, तर स्वैराचारामुळे तो अधोगतीकडे जातो. विवाहामुळे आनंद आणि आत्मीयता लाभून जीवन सुखकर होते, समाज सदाचारी होतो, तर स्वैराचारामुळे माणसावर बंधन न राहिल्याने तो व्यसनाधीन होऊन भरकटत जातो.
2. विवाहसंस्थेत शिरलेल्या विकृती आणि त्याचे दुष्परिणाम : 2 अ. लिव्ह इन रिलेशनशिप : विवाहसंस्थेत आज अनेक विकृती शिरल्या आहेत. लग्न न करतांच एकमेकांसह ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्याचा तरुणांचा कल वाढत आहे. विवाहामुळे येणारी बंधने, तसेच दायित्व नको अशी भूमिका घेत पाश्चात्त्य देशांत प्रचलित असलेली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही विकृती भारतातही बोकाळू पहात आहे. प्रत्यक्षात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणारे तथाकथित मुक्त तरुण-तरुणी कालांतराने पश्चात्तापाने पीडित होतात, अशी शेकडो उदाहरणे आहेत. श्रद्धा-आफताबच्या ‘लव्ह जिहादी’ नात्याचा अंत श्रद्धाचे तुकडे होण्यात कसा झाला, हेही काही दिवसांपूर्वी दिसून आले होते.
2 आ. विवाहबाह्य आणि समलैंगिक संबंध : आज विवाहबाह्य आणि समलैंगिक संबंधांचे प्रमाणही समाजात मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहे. याला दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपट हेही बर्याच अंशी कारणीभूत ठरत आहे. बहुतांश मालिकांमध्ये नवरा-बायकोपैकी एकाचे दुसर्यासोबत प्रेमप्रकरण चालू असल्याचे दाखवले जाते. दुर्दैवाने अशा विकृत मालिका आवडीने पहाण्याचे चित्र आज घराघरांमध्ये दिसते. अशाने कुटुंबियांवर, घरातील लहान मुलांवर काय संस्कार होतात, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.न्यायालयानेही काही महिन्यांपूर्वी लिव्ह इन रिलेशनशिप, तसेच समलैंगिक संबंध अवैध नसल्याचे निवाडे दिले होते. खरे तर प्राचीन भारतीय परंपरा आणि संस्कृती यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हायला हवे; पण अन्य देशांप्रमाणे बहुसंख्यांकांच्या प्रथा-परंपरा-शास्त्र हे भारतीय कायद्याचे मूळ स्त्रोत नसल्यामुळे भारतीय संस्कृतीला विपरित निवाडे होतांना दिसून येतात. त्याचा परिणाम विवाहसंस्थेवर पर्यायाने कुटुंब आणि समाज व्यवस्थेवर होत आहे.2 इ. नोंदणी विवाह : आज-काल नोंदणी विवाहही करण्याकडे कल वाढत आहे. नोंदणी विवाह करतांना धार्मिक विधींवरचा अविश्वास हे मुख्य कारण असते. प्रत्यक्षात विवाह शब्दाची व्याख्याच धार्मिक विधींशी संबंधित आहे. ‘विधिना वहति इति विवाहः ।’ म्हणजे ‘धार्मिक विधींना समवेत घेऊन जातो, तो विवाह, असे म्हटले आहे.‘नोंदणी विवाह’ ही पद्धत 1872 मध्ये इंग्रजांच्या राजवटीत निर्माण झाली. या माध्यमातून मिळणार्या करातून शासकीय उत्पन्न वाढवणे, हा ब्रिटिशांचा मुख्य उद्देश होता. या विवाहात कोणताही विधी न करता, तसेच मुहूर्त इत्यादी न पहाता कागदोपत्री विवाह केला जातो. हिंदु धर्मानुसार मनुष्याचा जन्म ईश्वरप्राप्तीकरिता आहे. गर्भधारणा ते विवाहापर्यंतच्या काळात जीवनात घडणार्या प्रमुख सोळा प्रसंगी केलेल्या धार्मिक संस्कारांमुळे मनुष्य ईश्वराच्या अधिक जवळ जातो, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. धार्मिक पद्धतीने विवाह केलेल्या अनेकांना याविषयी अनुभूतीही आल्या आहेत. नोंदणी विवाहात कोणतेही धार्मिक विधी होत नसल्यामुळे वधूवरांवर धर्मसंस्कार होत नाहीत. त्यामुळे अशा विवाहाला कायदेशीर मान्यता जरी मिळाली, तरी हा विवाह आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक ठरत नाही. यास्तव कमी खर्चासाठी नोंदणी विवाहाचा धर्मविरोधी पर्याय न निवडता अत्यंत साध्या पद्धतीने; मात्र सर्व धार्मिक विधींसह विवाह करणे अधिक श्रेयस्कर आहे.
2 ई. स्वैराचार आणि अहंकार : स्वैराचार आणि अहंकार यांमुळेही विवाह टिकण्यात अडथळे निर्माण होतात. सध्या कौटुंबिक न्यायालयांत घटस्फोटासाठी जी प्रकरणे येत आहेत, त्यांमध्ये अधिकतर ‘पती-पत्नी एकमेकांशी जुळवून घेण्यास सिद्ध नसणे’, हे कारण असते. ‘पटत नसेल, जमत नसेल, तर तू तुझ्या मार्गाने जा आणि मी माझ्या मार्गाने जातो/जाते’ अशी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. कुठे मोक्षप्राप्तीपर्यंत एकमेकांना साथ देणारे आधीच्या युगांतील पती-पत्नी, तर कुठे एकमेकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे धर्म आणि नीती झुगारलेले आधुनिक पती-पत्नी !
2 उ. घटस्फोटांचे वाढते प्रमाण : आज घटस्फोटांचे प्रमाणही वाढत आहे. विकसित देशांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण अत्यधिक आहे, तर तुलनेने कमी प्रगत असलेल्या देशांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण कमी आहे. प्रगत देशांतील विकासाचा केंद्रबिंदू आर्थिक असल्याने, तेथे संस्कृती, कुटुंबपद्धती यांचे स्थान दुय्यम असते. पर्यायाने तेथे स्वैराचार अधिक वाढतो. याउलट कमी प्रगत देशांत संस्कृती, परंपरा, आचार-विचार यांचे मूल्य अधिक असते. त्यामुळे समाजव्यवस्था उत्तम राखायची असेल, तर संस्कृतीचे पालन होणे आवश्यक आहे.
2 ऊ. तरुण पिढी संस्कारहीन होणे : विवाह आणि घटस्फोट यांच्या समस्यांमुळे मुलांवर संस्कार करण्यासाठी पालकांना वेळ नसल्याने तरुण पिढी संस्कारहीन आणि व्यसनाधीन होत आहे. संस्कारक्षम वयातील मुले संभ्रमित, हवालदिल होत आहेत. आज ‘लव्ह जिहाद’चे संकट फोफावले आहे, त्यामागे हिंदूंमधील धर्मशिक्षण आणि धर्माचरण यांचा अभाव हे मुख्य कारण आहे.
3. विवाहसंस्था टिकवण्यासाठी करायचे प्रयत्न : विवाहसंस्था टिकवण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. 3 अ. विवाह धर्मशास्त्रानुसार करणे : विवाह बंधनाने देवा-ब्राह्मणांसमक्ष आणि त्यांच्या शुभाशीर्वादाने संस्कारित होऊन दोन जीव त्यांच्या सांसारिक आणि आध्यात्मिक जीवनाच्या वाटचालीस आरंभ करत असतात. त्यांच्या सहजीवनाचा हा शुभारंभ विवाहविधींच्या मंगलमय आणि सात्त्विक वातावरणात होत असतो. शास्त्रानुसार आणि विधिवत् विवाह झाल्यासच या विधींतील संस्कारांचा लाभ वधू-वरांना होतो; परंतु आजकाल विवाह सोहळ्याला समारंभाचे स्वरूप आले आहे. महागड्या लग्नपत्रिका, ऊंची वेशभूषा, भव्य विवाह कार्यालय, ‘बँड’, आतषबाजी, कर्णकर्कश संगीत, झगमगाट, जेवणाचा थाटमाट इत्यादी गोष्टी असलेला विवाह म्हणजे ‘चांगला विवाह’, अशी चुकीची धारणा सध्या समाजात निर्माण झाली आहे. विवाह सोहळ्याकडे ‘एक मौजमजेचा कार्यक्रम’ म्हणून न पहाता ‘एक धार्मिक संस्कार’ म्हणून पहाणे आवश्यक आहे.
3आ. बंधनांचे पालन : सनातन धर्माने मानवाला निसर्गाला अनुकूल असे आदर्श जीवन जगण्याची शिकवण दिली आहे. पाश्चात्त्य विचारसरणी मुख्यतः जडवादावर आणि भोगवादावर आधारलेली आहे. त्यामुळे स्वच्छंदीपणे जीवन जगण्याकडे तेथील लोकांचा कल आहे; परंतु ईश्वराने निर्माण केलेले विश्व स्वच्छंदीपणे नव्हे, तर ठोस नियमांवर चालते. सनातन धर्माने मानवाला निसर्गाला अनुकूल असे आदर्श जीवन जगण्याचे नीती-नियम आखून दिले आहेत. विवाहाच्या बाबतीत जोडीदाराची निवड मनस्वीपणे न करता कुल, शील, वय आदी गोष्टी विचारात घेतल्यास वैवाहिक जीवन यशस्वी होण्याचे प्रमाण पुष्कळ वाढेल.
3 इ. ‘आई’पण जपणे : घर आणि त्यातील मुलांवर सुसंस्कार करण्याचे सर्वांधिक दायित्व आईवर असते. दुर्दैवाने आज मुलांवर सर्वप्रथम आणि मूलभू्त सुसंस्कार करणारी घर नावाची पहिली संस्कारकेंद्रे उद्ध्वस्त होत चालली आहेत. आता काही मोजकी घरे सोडल्यास बाकी बहुतांश घरांत मुलांवर देव, धर्म आणि राष्ट्र यांचे संस्कार करणारी तेजस्वी अन् कणखर आई उरलीच नाही. उलट ती आता आधुनिक ‘मम्मी’ झाली असून, ती स्वतःच गाऊन घालून मुलाला मातृभाषेऐवजी परकीय इंग्रजी भाषा शिकवण्यात, त्याला भारतीय आहाराऐवजी पिझ्झा, बर्गर, मॅगी, पाव, बिस्किट खाऊ घालण्यात धन्यता मानू लागली आहे. मुलांना ‘शुभम् करोती’, ‘रामरक्षा’ शिकवण्याऐवजी स्वतःच दूरदर्शनवरील फालतू मालिका पहाण्यात, गप्पा, पार्ट्या यात रममाण होऊ लागली आहे. मुलांच्या हातात संस्कारक्षम गोष्टीचे पुस्तक देण्याऐवजी दूरदर्शनचा रिमोट, संगणकाचा माऊस किंवा भ्रमणभाष देऊ लागली आहे. कारण आई बनणे अवघड असते, ‘मम्मी’ बनणे मात्र सोपे असते. आज अमेरिकेसारख्या देशांमध्ये ‘बॅक टू मदरहूड’ अर्थात् मातृत्वाकडे चला, ही चळवळ जोर धरू लागली आहे. तशी स्थिती भारतात येऊ द्यायची नसेल, तर ‘आई’पण जपणे आवश्यक आहे.
3 ई. प्रत्येकाने साधना करणे : ‘सत्ययुग ते द्वापरयुग या काळात सर्वजण सात्त्विक असायचे. त्यांच्यात स्वभावदोष आणि अहं कमी असायचे. ते साधना करत असल्यामुळे त्यांचा एकमेकांना समजून घेण्याचा भाग होत असे. कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता वाढत चालल्यामुळे लग्न टिकणे कठीण होऊ लागले आहे ! ‘लग्नाचा एक उद्देश आहे ‘परेच्छेने वागायला शिकणे’; पण फारच थोडे ते शिकतात ! दायित्वापेक्षा अधिकारांची भावना तीव्र असल्याने पती-पत्नी यांच्यामध्ये खटके उडण्याचे प्रमाण अधिक आहे. ते कमी करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने साधना करणे आवश्यक आहे. जेव्हा कुटुंबामध्ये सुसंस्कारांची पुंजी भरभक्कम होईल, तेव्हाच अवास्तव अपेक्षा, तुलना, कष्ट करण्याची वृत्ती नसणे यांसारख्या विवाहसंस्था टिकवण्यात येणार्या अडथळ्यांवर मात करता येईल.