
कुंडलवाडी/नांदेड| तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत नांदेड जिल्ह्यातील 3 तरुणांचा तर एक निजामाबाद येथील तरुणाचा मृत्यू झाला असल्याने एकच खळबळ उडाली. नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर कंटेनर व कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात चार तरुण ठार झाले असून, ही घटना सोमवार दि.१३ मार्च रोजी सकाळी १.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यात दोन सख्ख्या भावांचा समावेश असून, नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथील गणेश हानमुल्लू निरडी वय २६ वर्ष, आदित्य हानमुल्लू निरडी वय २३ वर्ष, प्रकाश सायबू अंकलवार वय २२ वर्ष यांचा तर निझामाबाद येथील साईराम भाळे याचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी ता. बिलाेली येथील गणेश, आदित्य, प्रकाश, व निझामाबाद येथील साईराम हे चाैघे तेलंगणा मधील हैदराबाद येथे काही कामानिमित्त गेले होते. परतीच्या प्रवासात कुंडलवाडीकडे येत असताना सोमवारी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास निझामाबाद जिल्ह्यातील इंदलवाई मंडळातील चंद्रायनपल्ली येथे भरधाव कार क्रमांक एपी २९ एडी ७९०९ व कंटेनरचा क्रमांक एचआर ३८ यू ७२८१ चा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी घटनास्थळाची भेट देऊन पाहणी करत पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी निझामाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघातातील तीन मुलांपैकी सेवानिवृत्त मुख्याध्यापक गंगाधर निरडी यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्यामुळे कुंडलवाडी शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कार-कंटेनरच्या अपघातात कारची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली हाेती.

