नांदेड। भाग्यनगर पोलीस स्टेशनला कार्यरत ,पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कानगुले यांनी अपघातात जप्त केलेली दुचाकी सोडण्यासाठी १८०० रुपयांची लाच मागितली. यावरून एसीबीच्या पथकाने लाच स्विकारताना रंगेहात पकडून यशस्वी कार्यवाही केली आहे. यामुळं पोलीस दलात होत असलेल्या लाचखोरी प्रकारावरून पोलिसांची प्रतिमेला डाग लागला आहे.
तक्रारदार यांच्याकडे कामाला असलेल्या मुलाकडून किरकोळ अपघात झाला होता. अपघातात एक महिला किरकोळ जखमी झाली होती. अपघातातील महिला तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे गेली. त्यावेळी आरोपी लोकसेवक यांनी यातील तक्रारदार यांची मोटार सायकल पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे लावली होती. महिला तक्रारदार व यातील तक्रारदार यांचेत तडजोड झाल्याने महिला तक्रारदार यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली नाही.
यातील तक्रारदार यांनी शिवाजी रामकिसन कानगुले , व्यवसाय नौकरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल यांना पोलीस स्टेशन येथे जमा केलेली मोटार सायकल परत करण्याची विनंती केली होती. यावेळी कानगुले यांनी मोटार सायकल परत करण्यासाठी रु. 5,000/- लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती रु. 3,000/- घेण्याचे ठरले. त्यापैकी तक्रारदार यांचेकडे असलेले रु. 1,200/- रुपयांची लाच लगेच घेतले. उर्वरित रु. 1,800/- देऊन मोटार सायकल परत घेऊन जाण्याचे सांगितले.
या लाचमागणी पडताळणी दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल कानगुले यांनी तक्रारदार यांना उर्वरित रु.1,800/- ची पंचासमक्ष लाचेची मागणी करून ती सापळा कार्यवाही दरम्यान स्वतः स्विकारली आहे. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल कानगुले यांना ताब्यात घेतले असुन, याबाबत पोलीस स्टेशन वजिराबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर सापळा कार्यवाही डॉ राजकुमार शिंदे, पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी श्री राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड यांच्या सूचनेनुसार तपास अधिकारी श्री. गजानन बोडके, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नांदेड यांनी सापळा कारवाई पथकाचे पोलीस निरीक्षक श्री जमीर नाईक, नानासाहेब कदम, पोहेकॉ सचिन गायकवाड, पोकॉ अरशद खान, ईश्वर जाधव चापोना गजानन राऊत ला.प्र.वि.युनिट नांदेड यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र,नांदेड, मोबाईल क्रमांक 9623999944, श्री राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड, मोबाईल क्रमांक – 7350197197, कार्यालय दुरध्वनी – 02262-253512 @ टोल फ्रि क्रं. 1064