
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे कामारी येथील एका शेतकऱ्याच्या घराला भर दिवसा शॉर्टसर्किट होऊन अन्न धान्य, गृहउपयोगी साहित्य, कपडे लत्ते आणि ५ तोळे सोनेचांदीच्या दागिन्यांसह ४ लाखाची नगदी रक्कम असा एकूण ७ लाखाचा मुद्देमाल आगीच्या भक्षस्थानी सापडला आहे. या संदर्भात हिमायतनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या नुकसाणीतून बाहेर काढण्यासाठी महावितरण कंपनीने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यास मदत द्यावी अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथील शेतकरी श्री परमेश्वर केशवराव शिरफुलें हे नित्याप्रमाणे कुटुंबासह दि.१५ रोजी सकाळी १०.३० वाजता शेतात गेले होते. दरम्यान फोन आला कि घराला आग लागली, म्हणून तात्काळ शेतकरी घरी आले मात्र तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी सापडले होते. घरात पाहणी केल्यानंतर शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागली असल्याचे निदर्शनास आले.

या आगीमुळे घरातील अन्न धान्य, गृहउपयोगी साहित्य, कपडे लत्ते आणि ५ तोळे सोनेचांदीच्या दागिन्यांसह ४ लाखाची नगदी रक्कम जाळून खाक झाली. यात शेतकऱ्याचे एकूण ७ लाखाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिमायतनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक ललित म्हणून नोंद करण्यात आली आहे. सादर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार श्री पोटे हे करत आहेत.

महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी
शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे, या नुकसानीचे पंचनामे करून महावितरण कंपनीने भरपाई देऊन उघड्यावर पडलेल्या शेतकरी कुटुंबास उभारी देण्यासाठी साथ देऊन मदतीचा हाथ द्यावा अशी मागणी केली जाते आहे.
