बारड/ नांदेड| आज सायंकाळी ४ च्या सुमारास अचानक वादळी – वारे, विजांचा कडकडाट होऊन काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. यात नांदेड -भोकर रस्त्यावर असलेल्या बारड महामार्ग सुरक्षा पथकाच्या चौकीवरील टिनपत्रे उडून गेली. त्यामुळे कार्यालयात गारांचा खच पडल्याचे पाहावयास मिळाले आहे. तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसासह गार पडल्या असून, अवकाळी पावसाच्या थैमानाने जनावरांचे मोठे हाल झाले असून, शेतकऱ्यांना या परिस्थितीचा सामना करताना मोठी अडचण झाली असल्याचे पाहावयास मिळाले आहे.
गेल्या तीन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात कधी ढगाळ वातावरण तर कधी उन्हाचा कडक जाणवत होता. नांदेड जिल्हात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे भाकीत वेध शाळेने वर्तविले होते. तर प्रश्नाने देखील खबरदारीचा उपाय करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज दुपारपासून आभाळात ढगांचे आक्रमण झाल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान सायंकाळी ४ वाजता वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन काही ठिकाणी तुरळक पाऊस तर काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला
यामध्ये नांदेड-भोकर महामार्गावरील बारड पोलीस मदत केंद्रावरील टिनपत्रे वादळी वाऱ्याने उडून गेले. त्याचबरोबर पावसाळा सुरुवात होऊन गारांचा पाऊस झाला. त्यामुळे येथील केंद्रात गारांचा खच पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. या संबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरला त्यात पोलीसांनी आपल्या डोक्यावर हेल्मेट परिधान करून जीव वाचविला असल्याचे दिसते आहे. एकूणच या वादळी पाऊस व गारांनी मात्र मोठे नुकसान केले आहे.