
पुणे/नांदेड| विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या कर्तबगार महिलांना दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून गौरविण्यात येते. यंदा २०२३ च्या गौरवमुर्ती महिलांची नावे विद्यार्थी विकास मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहेत.

यंदाचा सावित्रीबाई फुले सन्मान सहा कर्तृत्ववान महिलांना जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 1.संगीत साधनेत आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ गायिका कमलताई भोंडे, अमरावती, 2. नांदेड येथील उद्यमी, नृत्य कलाकार आणि पार्लिंगी समाज जागृती कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. सान्वी जेठवानी, 3. प्रशासकीय अधिकारी आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, मुंबई, 4. आदिवासी बहुल प्रांतात वंचित व वनवासींच्या सेवेत आयुष्य वेचणाऱ्या हेमलताताई बिडकर, नाशिक, 5. स्वकष्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उपमहाव्यवस्थापक पदाला गवसणी घालणाऱ्या श्रीमती प्रतिक्षा तोंडवळकर, मुंबई. 6. महिला उद्योजिका आणि परिवहन व्यावसायिक जाई देशपांडे, सातारा या महिलांना जाहीर झाला असल्याचे विद्यार्थी विकास मंडळाकडून सांगण्यात आले.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी विकास मंडळाच्या निर्भय कन्या अभियानांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येतो. या सन्मानाचे हे चौथे वर्ष असून यंदाच्या वर्षी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा.डॉ.संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शोध समितीने या नावांची निश्चिती केली आहे. येणाऱ्या काही दिवसांतच हा सन्मान समारंभ नियोजित असल्याचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संतोष परचुरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

