नांदेड। 2003 पासुन गोदावरी स्विमींग ग्रुपचे सर्व जलतरण पटु हे राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धामध्ये सातत्याने सहभाग घेवून प्रत्येक स्पर्धेत अनेक सुर्वणपदकांची लयलुट करतात. नांदेड येथे राष्ट्रीय संघटनेच्या आदेशाने प्रत्येक वेळी प्रांतीक अथवा राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करुन नांदेड जिल्ह्यातील विविध जलतरणपटुना सहभागी होण्याची संधी प्राप्त करुन देतात.
महाराष्ट्रामध्ये पुर्वी अमरावतीपासुन जलतरण संघटनेला सुरुवात झाली. परंतु आता नांदेडच्या जलतरणपटुणी प्रांत व राष्ट्रीय स्पर्धेत अनेकदा अधीक गुणांकन मिळवून प्रथम क्रमांकाची ढाल प्राप्त केल्याने भारतातील एक अग्रगण्य जलतरणाचे शक्तीकेंद्र म्हणून नांदेडचे संघटन गोदामाईच्या आशीर्वादाने ओळखल्या जावू लागले आहे. नांदेडचे जलतरण पटु श्री उत्तम पाटील (हातनीकर) हे मागीलवर्षी पोरबंदर येथे झालेल्या राष्ट्रीय सागरी 10 की.मी. जलतरण स्पर्धेत क्रमांक 3 पटकावून नांदेडचे नाव देशभरात गाजवीले तर श्री प्रकाश बोकारे, श्री.राजेंद्र ताटे या दोघांनी या वर्षी अंबाला कॅम्प (हरियाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय व पाचवा क्रमांक प्राप्त करुन नांदेडचे नाव देशभर झळकवले आहे.
यावर्षी शालेय स्पर्धेत कु.निॠती पीनलवार या 11 वीतील मुलींने अपयशाची परंपरा मोडीत काढून जिल्ह्यासाठी प्रथमच प्रांतस्तरीय पदक खेंचून आणले. दि.18 मार्च 2023 ला राष्ट्रीय जलतरण स्पर्धा नाशिक येथे आहेत. वयवर्ष 26 ते 80 पर्यंतचे 21 जलतरणपटू त्यासाठी तयारीनिशी जात आहेत.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत दिव्यांग जलतरण पटु श्री ओम गुंजकर यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केला. तर कु.निॠती पीनलवार हीने 5 कि.मी. स्पर्धेत 8 वा क्रमांक प्राप्त केला. केवळ दीड वर्षा पुर्वी स्वीमींग शिकलेली कु.अनन्या देशमुख, कु.गार्गी लामदाडे, अजिंक्य नरवाडे व कु.सायली ठाकुर ह्यांनी 5 कि.मी.अंतर 1 तासात पार केले. कोणत्याही स्पर्धेत हमखास मेडल आणणारे असा उल्लेख श्री चंद्रकांत लामदाडे, श्री अप्पा ध्याडे, श्री प्रमोद कुलथे, श्री.सुर्यवंशी यांचा करावा लागेल. शासकीय स्पर्धेत आमचे उपाध्यक्ष श्री.मुगाजी काकडे हे दरवर्षीच पारितोषकांचे मानकरी असतात तर पोलीसांच्या स्पर्धेतही संघटनेचे श्री.जाधव, श्री नरवाडे, श्री.जयप्रकाश क्षीरसागर हे सातत्याने विजयी होतात तर श्री पांडूरंग गवते (पीआय.मुंबई) हे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरणपटू आहेत.
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर दि.12.3.2023 रोजी तिरुपती येथे मास्टर्स अॅक्वॅटिक फेडरेशन ऑफ इंडियाची राष्ट्रीय कार्यकारी मंडळाची बैठक संपन्न झाली. बैठकीत नविन राष्ट्रीय कार्यकारर्णीची निवड हा विषय होता. नांदेडचे ज्येष्ठ जलतरण पटू व आमचे सर्वांचे प्रेरणास्थान श्री.अरुण (बापू) किनगावकर (नांदेड जिल्हा समन्वयक) यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याच बरोबर अत्यंत धडाडीचे समाजसेवी कार्यकर्ते श्री.सय्यद सुलेमान ह्यांना राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष, तर प्रांताचे सचिव श्री.शेखर भावसार यांचा राष्ट्रीय कार्यकारणीत समावेश ही मोठी जबाबदारी नांदेडवर आली. हे येथील सर्व जलतरणपटूंचा यशस्वीतेच्या साधनेचाच एक भाग आहे. जलजागरणाचे हे कार्य संघटना अधिक समाजव्यापी करण्याचा संकल्प करीत आहे. समस्त नागरिकांनी या जीवनदायी कलेच्या वृद्धीसाठी प्रयत्नशिल रहावे हेच विनम्र आवाहन !