
मुखेड/नांदेड। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील पांडुर्णी येथील ऊसतोड करणाऱ्या टोळीने पैसे घेऊनही कामावर न येता पोबारा केल्याचा प्रकार नुकताच घडला. या प्रकरणात मुकादमाने आपले दिलेले पैसे वसूल करण्यासाठी पोबारा केलेल्या टोळीचा ट्रक पळवून आणला. याप्रकरणात मुकदमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.१२ मार्चला तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यातील सदाशिव नगर येथे काळ्या रंगाच्या जीपमधील काही लोकांनी ट्रक चालकाला मारहाण करून ट्रक घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध त्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबद्दल तेलंगणा पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना सांगून नाकाबंदी करण्यास कळविले होते. त्यानुसार नांदेड पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी केली होती.

मुखेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश वाघ, सहायक पोलिस निरीक्षक किशोर बोधगिरे, उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे व जमादार किरणकुमार वाघमारे यांनी तपास मोहीम हाती घेतली. दरम्यान तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळ्या रंगाच्या गाडी बद्दल विचारपूस करून पांडुर्णी येथे मध्यरात्री भेट देऊन चौकशी केली असता सदर गाडी आढळून आली . या प्रकरणी गाडी व जळबा विठ्ठल टाळीकोटे यास तपासासाठी ताब्यात घेतले असता त्याने तेलंगणातून ट्रक आणल्याची कबुली दिली . हा ट्रक तालुक्यातील कुंद्राळा येथील शिवारात ठेवला असल्याचेही सांगितले. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी ट्रक व जीप ताब्यात घेऊन तेलंगणा पोलिसात आरोपी टाळीकोटे यासह दोन गाड्या हस्तांतरित करण्यात आले.

