
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव बा. येथील शरदचंद्र महाविद्यालयाच्या हिंदी विभागामध्ये दि.15 मार्च,2023 रोजी *विज्ञापन की भाषा* या विषयावर अतिथी व्याख्यान संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. हरीबाबू उपस्थित होते तर प्रमुख अतिथी व व्याख्याता म्हणून श्री मधुकरराव बापूराव पा. खतगावकर महाविद्यालय शंकरनगरचे प्रा.डॉ.पी.एम. भूमरे हे होते. आपल्या व्याख्यानामध्ये डॉ. भूमरे यांनी विज्ञापनाचा अर्थ व व्याख्या सांगून प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडीयावरील विज्ञापनाची भाषा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. रेडिओ व दुरदर्शनच्या जाहिरातीची हिंदी भाषा कशी असते हे त्यांनी आपल्या मोबाईलद्वारे प्रात्यक्षिक करून दाखविले.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.के. हरीबाबू यांनी विज्ञापनाचा अर्थात जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी विषयी माहिती दिली. जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी आपले करिअर जरूर वाढीस लावावे पण जाहीरात दिली म्हणून संबंधीताच्या बाजूने किंवा दिली नाही म्हणून त्यांच्या विरोधी बाजूने लिखाण करू नये. स्वच्छ पत्रकारिता हा समाजाच्या, राष्ट्राच्या उन्नतीचे प्रतिक आहे म्हणूनच त्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून उल्लेख केला जातो. पत्रकारितेवर कोण्ही शंका घेणार नाही या पध्दतीने सर्व मिडियाने काम करावे असे आवाहनही प्राचार्य डॉ.के. हरीबाबू यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमूख प्रो. डॉ. श्रीरंग वट्टमवार यांनी केले, सुत्रसंचलन प्रा डॉ. संजय भालेराव यांनी केले तर आभार प्रा.सुभाष गायकवाड यांनी मानले. यावेळी हिंदी विषयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

