
नांदेड। नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काल झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने रब्बी हंगाम आणि बागायती शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे . त्यामुळे गारपीटग्रस्त आणि नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत करा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे . बोंढारकर यांनी आज नांदेड दक्षिण मधील अनेक गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मदतीची मागणी केली आहे.

काल दिनांक 16 मार्च रोजी नांदेड जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. पशुधनाचे नुकसान झाले तर केळी, भुईमूग ,ज्वारी, हरभरा ,हळद ,गहू या पिकांचे मोठे नुकसान झाले .बागायती शेतीला फटका बसला .फळबागा आडव्या पडल्या तर भाजीपाल्याची शेतीही उध्वस्त झाली आहे . अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करावेत . पंचनाम्याचा अहवाल राज्य शासनाकडे त्वरित पाठवून द्यावा आणि गारपीटग्रस्तांना तातडीची मिळवून द्यावी अशी मागणी जिल्हाप्रमुखांनी केली आहे. या अनुषंगाने आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून नुकसानीचा अहवाल त्यांच्याकडे सादर करणार आहोत .

नांदेड दक्षिणसह जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत अशी माहिती जिल्हाप्रमुख बोंढारकर यांनी दिली . भायेगाव, राहेगाव, किकी, नागापूर ,सिद्धनाथ, पुयड वाडी, पुणेगाव आदी भागांना जिल्हाप्रमुख बोंढारकर यांनी भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी तहसीलदार किरण आंबेकर यांची भेट घेऊन पंचनामे करण्याची आणि मदतीची मागणी केली .

