
नांदेड। येथील कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून महिला विषयक कायदे जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात विधी क्षेत्रातील न्यायाधीश व तज्ञ अभिवक्ता महिलांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये महिला विषयक कायद्याची जनजागृती केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उस्मान गणी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडच्या सचिव न्यायाधीश सौ.डी.एम.जज, अॅड.व्ही.एस.मनवर, अॅड.मनीषा जे. गायकवाड, अॅड.डी.डी. डोणगावकर, अॅड.संध्या बुरला, अॅड.उज्वला ढगे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा.डी.बी. जांभरुणकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून झाली.

प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब भुक्तरे यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.मारोती भोसले आणि डॉ.स्मिता कोंडेवार यांनी करून दिला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थीनी नूरजहाँ बेगम, लमत गोहर, फिजा महेरोश यांनी मनोगत व्यक्त केले. या कायदेविषयक उद्बोधन शिबिरामध्ये अॅड.संध्या बुरला यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. अॅड.मनीषा जे. गायकवाड यांनी घरेलू हिंसा व त्या संबंधित कायद्यावर प्रकाश टाकला. अॅड.डी.डी. डोणगावकर यांनी अॅसिड हल्ला पीडित महिलांच्या कायदेविषयक अधिकारांची चर्चा केली.

अॅड.व्ही.एस. मनवर यांनी कार्यालय व कामकाजाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक शोषण आणि त्या विषयी असलेल्या कायद्यांची सविस्तर माहिती दिली. अॅड.उज्वला ढगे यांनी हुंडा प्रतिबंधक कायद्याविषयी विचार व्यक्त केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडच्या सचिव न्यायाधीश सौ.डी.एम.जज यांनी कायद्याचे ज्ञान आणि माहिती ही सर्वांनाच असली पाहिजे तरच आपण आपल्यावर झालेला अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी आवाज उठवू शकतो, म्हणजेच कायद्याची माहिती ही आज मूलभूत गरज बनली आहे. कायद्याची माहिती नसल्यामुळेच समाजामधील अनेक अवैध कार्य व हिंसात्मक घटनांना चालना मिळत असते जर नागरिकांना कायद्याचे ज्ञान असेल तर नागरिक त्या विरोधात आवाज उठवून या गोष्टींना आळा घालू शकतात. असे मत न्यायाधीश सौ.डी.एम.जज यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पुष्पा क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रा.मो.दानिश यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.शेख नजीर, प्रा.अक्षय हसेवाड, प्रा.फर्जाना बेगम, प्रा.नुरी बेगम, प्रा.सनोबर आफ्रिन, प्रा.शबनम बानो, प्रा.खान नदीम परवेज, प्रा.सय्यद सलमान, प्रा.सय्यद फराज, प्रा. निजाम, प्रा.अतिफोद्दिन, मोहम्मद मोहसिन, प्रभावती नवसागरे, मोहम्मदी बेगम, गौस खान पठाण आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

