
मुखेड/नांदेड। राज्य सरकारने महिलांना सर्व प्रकारच्या एसटीतून प्रवास 50% सवलतीची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेला महिला सन्मान योजना असे नाव दिले आहे. एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी प्रवास केला.

मुखेड तालुक्यात एका लग्न समारंभास त्या गेल्या होत्या. समारंभ आटोपून नांदेड ते मुखेड असा बस प्रवास त्यांनी केला. मुखेड ते नांदेड प्रवासाचे एसटीचे तिकीट 120 रुपये आहे. सवलतीच्या दरात 60 रुपये तिकीट काढून त्यांनी प्रवास केला. दरम्यान त्यांनी एसटी मधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांशी संवाद साधला. तसेच काही महिला प्रवाशांचे त्यांनी शाल व पुष्पहार घालून स्वागत केले.

यावेळी मुखेड शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटिल कबनुरकर, इसाक तांबोळी, बजरंग कल्याणी, सचिन रिंदकवाले, रवी गंदपवाड, सतीश डाकूरवार, आकाश पाटिल केरूरकर, बाबुराव पाटिल जांभळीकर, मारुती पाटिल, रावसाब पाटिल माकनिकर, पवन पोतदार, नामदेव शिंदे, गजानन लोखंडे, ज्ञानेश्वर डोईजड आदी उपस्थित होते.

65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या जेष्ठांना बस प्रवासात 50 टक्के सवलत मिळते. 75 वयापेक्षा जास्त असणाऱ्या एसटीने मोफत प्रवास करता येतो. विद्यार्थ्यांनाही शाळेत जाताना सवलत दिली जाते. शाळेत जाणाऱ्या पहिले ते आठवीपर्यंतच्या मुलींना तर मोफत प्रवास करता येतो. याच धर्तीवर महिलांसाठी 50% सवलत योजना राज्य शासनाने लागू केली आहे. बहुदा प्रवास करणाऱ्या महिलांना याचा फायदा होणार आहे. काही महिला कामानिमित्त रोज प्रवास करतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. खाजगी वाहनाने प्रवास करून जास्त पैसे खर्च करण्या ऐवजी या महिला आता अर्ध्या तिकिटात एसटी बसने प्रवास करतील, असे त्या म्हणाल्या.

शिवशाही सरकार, गतिमान कारभार- प्रणिताताई देवरे
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. देवेंद्रजीं फडणवीस यांनी एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत देऊन नारीशक्तीचा सन्मान केला आहे, असे मत प्रणिताताई देवरे- चिखलीकर यांनी व्यक्त केले.
