हिमायतनगर, अनिल मादसवार। हदगाव- हिमायतनगर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आज दि.18 रोजी सायंकाळी 4 वाजता पुन्हा हिमायतनगर शहरासह तालुक्यातील नदीकाठच्या गाव परिसरात वादळी वारे विजांचा कडकडाट होऊन गारांचा पाऊस झाला. यात अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली. तर शेतकऱ्यांच्या शेतीतील रब्बी पिके, जमीनदोस्त होऊन फळबागा यासह ईतर नुकसान झाले आहे. या नुकसाणीबाबत शासनाने सरसकट शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली जाते आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार हिमायतनगर तालुक्यातील सीरपल्ली, शेलोडा, हिमायतनगर,कोठा, बोरगडी, धानोरा, मंगरूळ, वारंगटाकळी, धानोरा, सिरंजनी, एकंबा, आदींसह नदीकाठच्या गावात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस व गारपीट झाली. या गारपिटीने शेतातील पिकात आणि गाव परिसरात गारांचा खच पडलेला दिसला. अवकाळी पावसाने ऊस, हरभरा, केळी, गहू, हळद, तीळ, मका, सूर्यफूल, उन्हाळी ज्वारी, भुईमूग, टरबूज, खरबूज, संत्री, मिरची, मोसंबी, भाजीपाला आणि आंब्याचं देखील प्रचंड नुकसान झाले आहे. गारांच्या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला असून, जणू बर्फाळ प्रदेशात राहतोय की काय..? असे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन दिवसांपासून आभाळात ढगांची गर्दी पावसाचे शिंतोडे येत असल्याने शेतकऱ्यांनी गहू, हरभरा काढणी करून ठेवली होते, मात्र आजच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी जमा करून ठेवलेलं वैरण देखील भिजून गेल्याने मुक्या जनावराना काय खाऊ घालावं या चिंतेत बळीराजा पडला आहे. एकूणच आज झालेल्या गारपिटीमुळे बळीराजा पुरता हतबल झाला असून, यातून सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.