
नांदेड,अनिल मादसवार। हदगाव- हिमायतनगर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आगोदर नापिकीमुळे हैराण असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा रब्बीत आस्मनी संकट कोसळले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ही बाब लक्षात घेता तात्काळ मतदार संघातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या अशी मागणी हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

हवामान केंद्राच्या अंदाजानुसार दि. १४ ते १७ मार्चच्या दरम्यान जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तो अंदाज खरा ठरला असून, नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर मतदार संघात १६ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या झालेल्या अवकाळी ऊस, हरभरा, पावसात केळी, गहू, हळद आदींसह ईतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला असून, आता शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज असल्याने शासनाने तात्काळ जिल्हा प्रशासनाला आदेशित करुन आर्थिक मदतीची तरतूद करुन द्यावी. अशी मागणी आ. जवळगावकर यांनी केली आहे.

हदगाव व हिमायतनगर या दोन्ही तालक्यात मोठ्या प्रमाणात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची बाब आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या लक्षात येताच त्यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची तात्काळ भेट घेऊन दोन्ही तालुक्यात झालेल्या नुकसानीचा पाढा वाचत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी यांना तात्काळ तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याचं सांगण्यात आले आहे.

