
नांदेड। दिनांक 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर जलदिनापूर्वीच्या आठवड्यात गावस्तरावर बैठका घेऊन जिल्हाभर जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, पंचायत राज मंत्रालय आणि राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात दिनांक 15 ते 21 मार्च दरम्यान स्वच्छता आणि जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या आठवड्यात ग्रामपंचायतींनी पाणी व स्वच्छता स्थितीचा विचार करून हर घर जल व हगणदारी मुक्त अधिक गाव घोषित करावे. सप्ताहांतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालयाची उपलब्धता, सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनावर भर द्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत सर्व घर, शाळा व अंगणवाडी केंद्र तसेच सार्वजनिक संस्थांना कार्यात्मक नळ जोडणी देणे आवश्यक आहे. जागतिक जल दिनापूर्वीच्या आठवड्यात ग्रामसभेची बैठक घेऊन संबंधित ग्रामपंचायतीने त्यांच्या पाणी व स्वच्छतेच्या स्थितीचा विचार करत हर घर जल व हागणदारी मुक्त अधिकचा दर्जा प्राप्त करून तसा ठराव पारित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. या सप्ताहानिमित्त गावस्तरावर हर घर जल आणि स्वच्छतेसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ यांनी केले आहे.

