
कंधार, सचिन मोरे। गेल्या चार दिवसापासून कंधार तालुक्यातील फुलवळ, पेठवडज, कुरुळा,उस्माननगर. बारुळ या भागात अवकाळी पाऊस व काही भागातील झालेल्या गारपिटीने या तालुक्यातील शेती व शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून त्यांना तात्काळ मदत द्या अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे यांनी तहसीलदार कंधार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की ” गेल्या चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने बऱ्याच भागात हजेरी लावल्याने कंधार, शहरासह फुलवळ, पेठवडज,कुरुळा,उस्माननगर, बारूळ या भागातील काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

हाताला आलेला गहू.जोंधळा. हारबरा,हळद,टरबूज खरबूज,आंबे या पिकासहित फळ झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे,पाऊसाची नोंद आपल्याकडे आहेच. त्या त्या भागातील तलाठी यांच्यामार्फत काही ठिकाणी आपण स्वतः पाहणी करून नोंद घ्यावी व त्या शेतकऱ्यांना शासनातर्फे नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाई योजनेतून मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान तर भरून येणे अशक्य असले तरी काही मदत होऊ शकते. तरी पाहणी करून संकटग्रस्तांना आधार देण्यासाठी मदतीचा हात द्याव्या अशी मागणी माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे यांनी केली आहे.

