हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार। काल शनिवारी तालुक्यातील नदीकाठच्या गाव परिसरात वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन गारपीट झाली. यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अस्मानी संकटात अडकला आहे, हातातोंडाशी आलेला गहू, हरभरा, यासह ईतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात येताच आज दि.19 रोजी सकाळी 9 वाजता आ माधवराव पाटील जवळगावकर यांनी डोल्हारी, पळसपुर सह नदीकाठच्या गावशीवारास भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पहाणी करून शेतकऱ्यांना दिलासा देत, शासनाकडून नुकसान भरपाई मदत मिळुन देण्याचे आश्वासन दिलं आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठच्या गाव परिसरात वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास गारपीट झाली. वादळी वाऱ्याने व पावसासोबत पडलेल्या गारामुळे रब्बी आणि बागायत पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली. तसेच नदीकाठच्या सीरपल्ली, शेलोडा, पळसपूर, हिमायतनगर, कोठा, बोरगडी, धानोरा, मंगरूळ, वारंगटाकळी, धानोरा, सिरंजनी, एकंबा, आदींसह अन्य गावाच्या शेतीतील ऊस, हरभरा, केळी, गहू, हळद, तीळ, मका, सूर्यफूल, उन्हाळी ज्वारी, भुईमूग, टरबूज, खरबूज, संत्री, मिरची, मोसंबी, भाजीपाला आणि आंब्याला देखील जबरदस्त फटका बसून प्रचंड नुकसान झाले आहे.
यापूर्वी हदगाव- हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या अशी मागणी हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदन देऊन केली होती. थेट मुंबईहून परत येताच शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आ. जवळगावकर यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन भेट देत शेतकऱ्यांना दिलासा थेट घाबरू नका मी सोबत आहे. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रयत्नशील आहे. असे सांगुन थेट तहसीलदार गायकवाड यांना दूरध्वनीवरून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी स्वतः बांधावर जावे अश्या सूचना केल्या. यावेळी त्यांच्या सोबत माजी जी प सदस्य सुभाष दादा राठोड, शहराध्यक्ष संजय माने, नाजीमचे संचालक गणेश शिंदे, माजी तालुकाध्यक्ष जनार्दन ताडेवाड, डॉ प्रकाश वानखेडे आदींसह नुकसानग्रस्त शेतकरी, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.