
नांदेड। देशातील एकुण हळद उत्पादना पैकी हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक हळदिचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली गुणकारी हळद खासदार हेमंत पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिली. हिंगोलीची हळद थेट पंतप्रधानाच्या स्वंयपाक घरात पोहचल्याने हिंगोली लोकसभा मतदार संघात सर्वत्र चर्चा होत आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अतिशय व्यस्त कामकाजातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ काढत खासदार हेमंत पाटील यांना परिवारासह भेटण्यास शुक्रवारी (दि.१७) वेळ दिला. या भेटी दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी आजवर केलेल्या विकास कार्याचा आढावा सादर केला. त्यानंतर शिरड शहापूर येथील कोच्या, कुरुंदा येथील संभाजी सिद्धेवार यांच्या शेतातील हळदीचा बंडा, गटुशेट मुरक्या व प्रल्हाद इंगोले यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या हळदीपासून तयार केलेल्या हळद पावडराचे विशेष गुणधर्म याबद्दल माहिती देत कोच्या, बंडा भेट म्हणून दिला.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याशी चक्क शुद्ध मराठीतून संवाद साधत हिंगोली जिल्ह्यातील वसमतच्या कन्हेरगाव शिवारात उभारले जात असलेल्या मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राबद्दल माहिती घेतली. हिंगोली जिल्ह्यातील हळदीला चांगले दिवस येतील आणि जिल्ह्यात हळदीचे क्लस्टर निर्मिती व हळदीवर आधारित लघु उद्योग उभे करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार हेमंत पाटील यांना आश्वासन दिले.

तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे होणाऱ्या मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राबाबत माहिती दिली आणि हा प्रकल्प हिंगोलीसह नांदेड, यवतमाळ, परभणी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना नवं संजीवनी देणारा ठरणार असून, लवकरच या केंद्राचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.या समारंभाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रण खासदार हेमंत पाटील यांनी दिले. यावेळी गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील, रुद्र हेमंत पाटील, प्रितेश पाटील, मयूर मंत्री आदींची उपस्थिती होती.

