Tuesday, June 6, 2023
Home मनोरंजन लातुरात २६ ते २८ मार्च दरम्यान पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -NNL

लातुरात २६ ते २८ मार्च दरम्यान पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -NNL

विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन व अभिजात फिल्म सोसायटीच्या आणि महाराष्ट्र शासन यांचा संयुक्त उपक्रम ; माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने लातूरकरांसाठी खास पर्वणी; प्रवेश नि:शुल्क पण नोंदणी आवश्यक; दर्जेदार, आशयघन ३ मराठी चित्रपटांचा समावेश; ३ दिवस लातूरकर सिनेरसिकांना १७ देशी-विदेशी चित्रपट पाहण्याची संधी

by nandednewslive
0 comment

लातूर| सुजाण चित्रपट रसिकांना जागतिक सिनेमाची ओळख व्हावी, देश-विदेशातील चित्रपट त्यांना एकत्र पाहता यावेत, या उदात्त हेतूने विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन व अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने २६ ते २८ मार्च २०२३ असे ३ दिवस लातुर येथील पीव्हीआर थिएटर मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे .

या निमित्ताने मराठवाड्यात औरंगाबादेनंतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव घेण्याचा मान लातूरला मिळतो आहे. रविवार, दि. २६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता फेस्टिवलचे उद्घाटन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री व लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते होईल. पुणे फाऊंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेल, एफटीआयचे माजी अधिष्ठाता समर नखाते व पुणे फेस्टिवल चे संचालक विशाल शिंदे व अभिजात फिल्म सोसायटीचे पदाधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

प्रादेशिक भाषेतील चित्रपटांसोबतच आंतरराष्ट्रीयस्तरावर चित्रपट कसे निर्माण होतात. ऑस्कर व इतर फेस्टिव्हलमध्ये पुरस्कारासाठी निवडण्यात येणारे चित्रपटांचे विषय, त्यामागची प्रेरणा, त्याची मांडणी या सर्व बाबींची रसिकांना ओळख व्हावी, तसेच आपल्या भागातही सिने साक्षरता निर्माण व्हावी, हा या फेस्टिवलचा प्रमुख उद्देश आहे. या तीन दिवसात देशी चित्रपटांसोबतच विदेशी चित्रपटांचीसुध्दा पर्वणी लातूरकरांना अनुभवता येणार आहे.

लातूरकर व इतर ठिकाणाहून येणाऱ्या रसिकांसाठी महोत्सव नि:शुल्क आहे. मात्र त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. पीव्हीआर थिएटरवर दि २३ मार्च पासून नोंदणी करता येईल. थिएटरवर यासाठी स्वतंत्र कक्ष असेल.

‘बॉय फ्रॉम हेवन’ ओपनिंग फिल्म
रविवारी उद्घाटन समारंभानंतर स्वीडिश दिग्दर्शक तारीक सालेह यांचा ‘बॉय फ्रॉम हेवन’ हा चित्रपट दाखवून महोत्सवाचा प्रारंभ होईल. कान फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळालेला आहे. ऑस्करच्या प्राथमिक फेरीतही हा चित्रपट होता.

तीन मराठी चित्रपट
तीन दिवस चालणाऱ्या फिल्म फेस्टिवलमध्ये कविता दातीर व अमित सोनावणे दिग्दर्शित ‘गिरकी’, मयूर करंबळीकर दिग्दर्शित *’डायरी ऑफ विनायक पंडित’* व अनिल साळवे दिग्दर्शित ‘ग्लोबल आडगाव’ हे तीन मराठी चित्रपट दाखवले जातील.

भारतीय भाषा विभाग
या फेस्टिवलमध्ये मराठी शिवाय इतर भारतीय भाषेतील तीन चित्रपट आहेत. ते पुढील प्रमाणे – ‘बॅक टू फ्युचर’ (डॉक्यूमेंटरी – दिग्दर्शक मनोहर बिश्त), ‘द स्टार इज मूवींग’ (तमिळ – दिग्दर्शक – पा. रंजित), ‘सोल ऑफ सायलेन्स’ (असामी – दिग्दर्शक – धनजित दास)

जागतिक विभागातील चित्रपट
`जागतिक विभागात (वर्ल्ड सिनेमा) ‘द केस’ (दिग्दर्शक- नीना गौसेवा, रशिया), ‘सोन्ने’ (दिग्दर्शक- कुर्दवीन आयुब, ऑस्ट्रिया), ‘लैलाज ब्रदर्स’ (दिग्दर्शक- सईद रौसोई, इराण) ‘द चॅनेल’ (दिग्दर्शक – थाएरी बिन्श्ती, फ्रान्स, बेल्जियम), ‘लायरा’ (दिग्दर्शक – एलिसन मिलर, आयर्लंड, युके) ‘हबीब’ (दिग्दर्शक – बेनोत मारी, बेल्जियम, फ्रान्स), ‘डायव्हरटीमेंटो’ (दिग्दर्शक – मारी कैसल, फ्रान्स), ‘रिच्यूअल’ (दिग्दर्शक – हँन्स हर्वोस, बेल्जियम, जर्मनी) ‘ब्रोकर’ (दिग्दर्शक- हीरोक्जू कोरीदा, दक्षिण कोरिया) हे चित्रपट विविध विदेशी भाषेत असले तरी प्रत्येक चित्रपटाला इंग्रजी सब टायटल असतील. विशेष म्हणजे हे सर्व सतरा चित्रपट अप्रदर्शित आहेत. त्यामुळे प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटांचा लातूर परिसरातील रसिकांना आस्वाद घेता येणार आहे. जिल्ह्यातील चित्रपट प्रेमींनी तीन दिवसीय फिल्म फेस्टिवलचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!