
नायगाव| संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्था मागच्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. संस्था नांदेड सह मराठवाड्यातील अनेक टंचाईग्रस्त गावात समग्र ग्रामविकास प्रकल्प राबवून या गावांना जलसमृद्ध केले आहे. नुकतेच यशदा पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात संस्थेला जलसंवर्धन क्षेत्रातील शाश्वत कार्यासाठी उत्कृष्ट सहयोगी संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.


सेवावर्धिनी पुणे संस्थेच्या सहकार्याने व ऍटलास काप्को कंपनी यांच्या सक्रिय व आर्थिक सहभागातून जलदूत 2.0 हा जलसंधारणातील पथदर्शी प्रकल्प संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून 2019 ते 2023 या कालावधीत मांजरम येथे राबविण्यात आला . या प्रकल्पाचा समारोप कार्यक्रम दि 18 मार्च 2023 रोजी यशदा पुणे येथे संपन्न झाला.


संस्थेने मांजरम येथे माती,पाणी जतन व संवर्धन विषयीं जनजागृती, विविध सर्वेक्षण, तांत्रिक क्षमता, गाव जल सुरक्षा व शाश्वतता आराखडा, केलेल्या कामाचा आर्थिक परिणाम व शाश्वतता, संस्था सक्ष्मीकरण आदी क्षेत्रात यशस्वीपणे कार्य केल्यामुळे संस्थेला जलदूत 2.0 उत्कृष्ट सहयोगी संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला.


या प्रसंगी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (उपसंचालक यशदा, पुणे) डॉ. नितीन करमाळकर, (माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), ऍटलास काप्को कंपनीचे कार्पोरेट एचआर प्रमुख कबीर गायकवाड, कंपनीच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी विभागाचे व्यवस्थापक अभिजित पाटील, यशदा जलसाक्षरता केंद्राचे संचालक डॉ. आनंद पुसावळे,सेवावर्धिनी संस्थेचे सचिव सोमदत्त पटवर्धन, कार्यवाह प्रमोद कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त संस्थांचा गौरव करण्यात आला.

सन्मान चिन्ह व एक लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. *संस्था प्रतिनिधी गंगाधर कानगुलवार यांनी गाव जलदूत शिवाजी गायकवाड, सचिव पांडुरंग शिंदे, माधव शिंदे,बालाजी शिंदे , विद्याधर जांभळे आदी ग्रामस्थांसह हा पुरस्कार स्वीकारला.
