
नांदेड। अन्न वाया न जाता खऱ्या गरजूंना अन्नदान व्हावे या उद्देशाने अमरनाथ यात्री संघाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘ भाऊचा माणुसकीचा फ्रिज ‘ या उपक्रमामध्ये आतापर्यंत १२ हजारापेक्षा जास्त जेवणाचे डबे वितरित करण्यात आले असून आगामी वर्षभरासाठी २९० अन्नदाते मिळाले असून आणखी ७० अन्नदात्यांची आवश्यकता असल्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राजस्थानी महिला मंडळातर्फे वर्षभर दररोज एक डबा देण्यात येणार असल्याची संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.


गुढीपाडव्याचे औचित्य साधून पंचवटी हनुमान मंदिराजवळ एक कार्यक्रम घेण्यात आला. राजस्थानी महिला मंडळ अध्यक्ष शांता काबरा यांनी भाऊच्या माणुसकीच्या फ्रिजमध्ये राजस्थानी महिला मंडळातर्फे अल्पसे योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी गंगाबिषण कांकर, लायन्स अन्नपूर्णा अध्यक्ष अरुणकुमार काबरा, राजस्थानी महिला मंडळ सचिव गायत्री तोष्णीवाल, कोषाध्यक्ष छाया बाहेती,संध्या छापरवाल, एकता व्यास,सविता काबरा, संगीता सोमाणी, हेमा बजाज, चंदा जाजू, मानुबाई पुरोहित, गीता झंवर यांची उपस्थिती होती. यावेळी छोटे गुढी महिलांनी एकमेकांना भेट दिली. नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिलीप ठाकूर यांनी उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.नांदेड शहरात कोणीही उपाशी राहू नये यासाठी ११ ऑक्टोबर २०२२ पासून भाऊचा माणूसकीचा फ्रिज हा नवीन उपक्रम पंचवटी हनुमान मंदिर महावीर चौक नांदेड येथे सुरू करण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. दररोज किमान पाच ते सात व्यक्ती शिल्लक राहिलेले अन्न फ्रिजमध्ये आणून ठेवत आहेत.


याशिवाय दररोज सकाळी दहा वाजता कधी चाळीस तर कधी ऐंशी तर कधी एकशे वीस डबे अन्नदात्यांकडून जमा करून वितरित करण्यात येत आहे. सकाळी दहाची वेळ फिक्स असल्यामुळे अनेक गरजू जेवणाचे डबे घेण्यासाठी रांगेत उभे असतात. दात्यांच्या हस्तेच डब्याचे वितरण करण्यात येते. समाज माध्यमातून या वितरणाची छायाचित्रे प्रसारित करून दररोज चाळीस हजारापेक्षा जास्त लोकांपर्यंत माहिती पोंहचिवण्यात येते. हा फ्रिज सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत उघडा ठेवण्यात येत असून त्यामध्ये कोणीही व्यक्ती खाद्यपदार्थ आणून ठेवू शकतात आणि कोणीही व्यक्ती खाद्यपदार्थ मोफत घेऊन जाऊ शकतात. या ठिकाणी महेंद्र शिंदे हे स्वयंसेवक पूर्णवेळ उपस्थित राहून फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी आलेले अन्नपदार्थ खाण्यासाठी योग्य आहेत की नाहीत याची छाननी करून एका व्यक्तीला एक डबा देण्याची व्यवस्था करतात.


आगामी काळात खालील तारखांसाठी अन्नदात्यांची आवश्यकता आहे. एप्रिलच्या ३,४,१६,१८,१९,२५ याशिवाय मे महिन्यातील २,४,७,९,१२,१८, २०,२२,२३, २४,२५,२७ या तारखांसाठी दानशूर नागरिकांची आवश्यकता आहे.जून महिन्याच्या ९,१६,१८,२१,२६,२८,२९,३० तर जुलैच्या १,६,१०,११,१३, १५,१६,१७, २०,२१,२२,२३,२५,३० या दिवसासाठी अन्नदाते पाहिजे आहेत. ऑगस्ट मध्ये १,३,६,७,१३,१६,१७,१८,२३,२४,२७,२९, ३१ या व्यतिरिक्त सप्टेंबर मध्ये १,२,३, ४,५,६,८,१०,१२,१४,१६, १८,२१,२५, २८,२९,३० आणि ऑक्टोबर मध्ये १,५,६,८,१० या दिवसासाठी अद्याप अन्नदाते मिळालेले नाहीत.चाळीस डबे कमी पडत असल्यामुळे एकाच दिवशी दोन व्यक्ती देखील अन्नदान करू शकतात.

आपल्या प्रियजनांच्या वाढदिवसा निमित्त अथवा स्मृती प्रित्यर्थ जेवणाचे डबे अथवा इतर खाद्यपदार्थ दयायचे असतील तर दोन हजार रुपये राजेशसिंह ठाकूर यांच्या मोबाईल क्रमांक ९४२२१ ८५५९० वर गुगल पे अथवा फोन पे करून संपर्क साधावा. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब अन्नपूर्णाचे अध्यक्ष अरुणकुमार काबरा, कोषाध्यक्ष सविता काबरा, विजय वाडेकर, महेंद्र शिंदे, विलास वाडेकर, राजेशसिंह ठाकूर, कामाजी सरोदे, प्रभुदास वाडेकर हे परिश्रम घेत आहेत. दानशूर नागरिकांनी या उपक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदवून ॲड. दिलीप ठाकूर यांच्या अन्नदान चळवळीमध्ये हातभार लावावा असे आवाहन राजस्थानी महिला मंडळातर्फे करण्यात आले.
