
नवी दिल्ली। परभणी ते मनमाडपर्यंतच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामास प्राधान्य व गती देतानाच, नांदेड-लोहा -अहमदपूर ते लातूर रोड ह्या नव्या रेल्वेमार्गास मंजुरी देण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरूवारी येथे दिली.


नांदेड आणि मराठवाड्याच्या रेल्वेविषयक वेगवेगळ्या प्रलंबित तसेच काही नव्या मागण्यांसंदर्भात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर तसेच माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री वैष्णव यांची संसद भवनातील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी पर्व सध्या सुरू असल्याचे वैष्णव यांच्या निदर्शनास प्रारंभीच आणून दिल्यानंतर त्यांनी शिष्टमंडळाच्या बहुसंख्य मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.


केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये मराठवाडा जनता विकास परिषदेचे उपाध्यक्ष सोमनाथ रोडे, भाजप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, रवींद्र पोतगंटीवार, हर्षद शहा, शंतनु डोईफोडे, संजीव कुळकर्णी, पिराजी चव्हाण, ज्ञानेश्वर दापकेकर, पत्रकार कमलेश गायकवाड इत्यादींचा समावेश होता.


मनमाड-हैदराबाद या मराठवाड्यातील जुन्या रेल्वेमार्गावरील परभणी ते मुदखेड दरम्यानच्या मार्गाचे दुहेरीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. पुढच्या टप्प्यात मनमाड ते परभणीपर्यंतच्या मार्गाचे दुहेरीकरण प्राधान्याने पूर्ण करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आल्यानंतर ही बाब रेल्वेमंत्र्यांनी मान्य केली. तसेच वर्धा-यवतमाळ-नांदेड या नव्या रेल्वे मार्गासोबतच नांदेड-लोहा-लातूर रोड या प्रस्तावित रेल्वेमार्गास मंजुरी मिळावी, अशी मागणी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली असता ती मंत्र्यांनी तात्काळ मान्य केली.

शिष्टमंडळातील रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष शंतनुु डोईफोडे यांनी औरंगाबाद-अहमदनगर या नव्या रेल्वेमार्गाकडे वैष्णव यांचे लक्ष वेधले. त्यावरही त्यांनी पुढील प्रक्रिया सुरू करण्याची तयारी दर्शविली. या मार्गाचे सर्वेक्षण २०२१ मध्ये झाले असून त्याचा परतावा दर (आरओआर) समाधानकारक आहे, ही बाबही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

सुमारे अर्ध्या तासाच्या चर्चेत जालना ते खामगाव तसेच औरंगाबाद ते चाळीसगाव या दोन नव्या रेल्वेमार्गांकडेही रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. नांदेडच्या मुख्य रेल्वे स्थानकावर पडलेला ताण लक्षात घेऊन लगतच्या मालटेकडी रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात यावा व काही गाड्या तेथून सोडण्यात याव्यात, ही शिष्टमंडळाची मागणीही रेल्वेमंत्र्यांनी मान्य केली.

छोट्या उद्योजकांसाठी रेल्वेस्थानकावर रॅक लोडींगऐवजी पीसमिल लोडींग अथवा ब्लॉक लोडींगची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना उद्योजक हर्षद शहा यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर मांडली. त्यावरही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. खा.चिखलीकर यांनी यावेळी काही नवीन रेल्वेगाड्या तसेच काही गाड्यांचा विस्तार करण्याची मागणी मांडली. त्याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पुर्णा येथे असलेल्या रेल्वेच्या सुमारे दीडशे एकर जागेवर एखादा नवीन प्रकल्प टाकता येईल काय, याची चाचपणी करण्याचे आश्वासनही रेल्वेमंत्र्यांनी दिले.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा दोन वेगवेगळ्या निवडणुकांत पराभव करणारे आजी-माजी खासदार रेल्वेमंत्र्यांना प्रथमच भेटले. नांदेड-बिदर रेल्वेमार्गाचा विषय मार्गी लावल्याबद्दल नांदेडकरांनी रेल्वेमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देत आभार मानले. यावेळच्या त्या चर्चेत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या कार्यशैलीची प्रशंसा करताना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी एक चांगला तसेच रेल्वेविषयक मागण्यांचा पाठपुरावा करणारा मजबुत खासदार, असे गौरवोद्गार काढले.