
नांदेड| खलिस्तान समर्थक व “वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंहला पकडण्यासाठी पंजाबसह देशभरातील पोलिस कामाला लागले आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्रातही हाय अलर्ट घाेषित करण्यात अाला आहे. अमृतपाल नांदेड शहरातही येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने स्थानिक पाेलिसांकडून तीन दिवसांपासून शहरातील प्रवेश मार्गांवर वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. मात्र, अद्याप तरी पोलिसांनी कुणालाही ताब्यात घेतलेले नाही असे सांगितले जाते आहे.


या संदर्भात पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले कि, नांदेड मधून अमृतपालचा एकही समर्थक सापडला नाही. पंजाब राज्यातील अनेक गुन्हेगार गुन्हे करून नांदेडसारख्या शहरात वास्तव्यास येतात. अनेक वेळा नांदेड पोलिसांच्या मदतीने पंजाब पोलिसांनी नांदेडमधून त्यांचे मोस्ट वाँटेड आरोपी यापूर्वी पकडले गेले आहेत.


त्यामुळे नांदेड शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर करडी नजर ठेवण्यात आली असून, शहरातील अनेक गुरुद्वारे, डेरे, लंगर आदी धार्मिक स्थळांची कसून तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. कवठा पूल, वजिराबाद चौक, वाजेगाव, असना चौक, मालेगाव रोड ठिकाणी नाकेबंदी केली आहे. संशयास्पद व्यक्तींची विचारपूस करून रेल्वेमार्गाने येणाऱ्या सर्व यात्रेकरूवर पोलिसांची करडी नजर दिसते आहे.

