
उस्माननगर, माणिक भिसे। देशभर २१ मार्च हा दिवस विजय दिन म्हणून साजरा होत असताना नांदेड येथील लोकतंत्र सेनानी संघ महाराष्ट्र जि.नांदेड यांच्या वतीने विजय दिन उत्साहात साजरा करण्यात केला.


सन १९७५ ते १९७७ या कालावधीत तत्कालीन शासन कर्त्यांनी देशावर आणीबाणी लादली. या हुकूमशाहीच्या विरोधात लोकशाही मार्गाने सत्याग्रह करणाऱ्या सत्याग्रहींना मिसा अंतर्गत बंदीवास सोसावा लागला. लोकतंत्रासाठी लढा देणाऱ्या लोकतंत्र सेनानीच्या संघर्षाला अखेर 21 मार्च 78 रोजी यश मिळाले. तेव्हापासून लोकतंत्र सेनानी कडून देशभर 21 मार्च हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचाच एक भाग लोकतंत्र सेनानी संघ महाराष्ट्र, जि. नांदेड यांच्याकडून विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


माहेश्वरी भवना समोरील अरुणा बंकेट हॉल येथे घेण्यात आलेल्या या सोहळ्याच्या व्यासपीठावर लो.तं.से. महाराष्ट्र प्रांताचे कार्याध्यक्ष रघुनाथ दीक्षित, लोकतंत्र सेनानी संघाचे पूर्व महासचिव विश्वासराव कुलकर्णी, प्रांत उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हाध्यक्ष दत्तोपंत देबडवार, जिल्हा कार्याध्यक्ष वारकड गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हा सेनानी संघाकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.


प्रास्ताविक करताना देबडवार यांनी लोकतंत्र सेनानी संघ शाखा नांदेडच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. इतर राज्यात 2018 पासून सेनानींना मानधन चालू होते, परंतु आणीबाणीच्या समर्थकांमुळेच महाराष्ट्रात उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्व महासचिव विश्वासराव कुलकर्णी यांनी शासनाकडे हुकूमशाही विरोधात लोकशाहीसाठी लढा दिलेल्या सेनानींना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा द्यावा, मध्य प्रदेशाप्रमाणे मानधन मिळावे अशा विविध मागण्यांची निवेदन केले असून संघटना या मागण्यांचा सतत पाठपुरावा करेल अशी ग्वाही दिली. यावेळी आप्पाराव कुलकर्णी (लातूर), रघुनाथजी दीक्षित यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कार्याध्यक्ष वारकड गुरुजी यांनी केले, तर आभार सहसचिव एल.के. कुलकर्णी यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल नातू जयप्रकाशजी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला आप्पाराव कुलकर्णी (लातूर जिल्हाध्यक्ष), सुभाषराव महाजन (परभणी) सह नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील लोकतंत्र सेनानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
