
नांदेड। शहीद भगतसिंघ, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिनानिमित्त दि.२३ मार्च रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिन साजरा करीत शहीदांना अभिवादन करण्यात आले. इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद हे घोषवाक्य शहीद दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा पुन्हा जोरजोरात बोलल्या जात होते.


दि.२३ फेब्रुवारी ते २३ मार्च असा एक महिन्याचा कालावधी माकपच्या आंदोलनाचा पूर्ण झाला असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढलेल्या पत्राना विविध कार्यालयानी न जुमानता कारवाई केली नसल्याने आंदोलन एक महिना होऊनही अखंड सुरूच आहे.


भारतीय उत्सवाचे दोन मोठे सण होळी आणि गुडीपाडवा माकप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच उपाशी राहून साजरे केले आहेत. नांदेड रेल्वे स्टेशन येथे सफाईचे कार्य करणाऱ्या जगदेव इन्फ्रास्ट्रक्चर च्या उप ठेकेदारावर आणि व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करून करावाई करावी.मौजे वझरा शेख फरीद ता.माहूर येथे तातडीने प्लॉट पाडून घर बांधण्यासाठी कुंभारी सोलापूरच्या धरतीवर प्लॉट धारकांना पाच लाख रुपये देण्यात यावेत आणि ऐतिहासिक पार्शवभूमी असलेल्या गावातील नागरिकांचे स्थलानंतर थांबवावे. तसेच गावखारीची शासकीय जमीन विक्री करून फसवणूक करणाऱ्या जमीन ताबेदारावर कारवाई करावी. नांदेड जिल्ह्यातील बोगस दस्त नोंदणी,मुद्रांक व जमीन घोटाळ्यातील अधिकारी – कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून माकपच्या मूळ मागणी प्रमाणे कारवाई करावी.


माहूर वन परीक्षेत्र अधिकारी (प्रा.) यांनी सीटूच्या वनमजूरांना कामावर घेण्याचे आश्वासन पूर्ण केले नसून परीक्षेत्रामध्ये बोगस विकास कामे दाखवून शासनाचे लाखो रुपये उचलून अपहार केला आहे.त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. शहरातील बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्या मंदिर गांधी नगर या शाळेला अभय देणाऱ्या गट शिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकारी नांदेड यांच्यावर कारवाई करून ती शाळा सील करून आज पर्यंत उचललेली रक्कम वसूल करण्यात यावी.कार्यकाळ संपूनही वसिलेबाजीने एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात.

जिल्हा पोलीस दलात पोलीस संरक्षण आणि शस्त्र परवाना अहवाल सादर करण्यामध्ये अनियमितता झाली आहे.कसून चौकशी करून योग्य कारवाई करावी.आदी प्रमुख मागण्यासह इतरही मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,सीटू आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिनाभरा पेक्षाही जास्त काळापासून अखंड आंदोलन सुरु आहे. जिल्हाधिकारी नांदेड यांनी पोलीस अधीक्षक,मुद्रांक जिल्हाधिकारी,उप वनसंरक्षक, सहायक समाज कल्याण आयुक्त,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी किनवट,तहसीलदार माहूर, नांवाशमनपा आयुक्त, पोलीस ठाणे वजीराबाद आदींना दिले आहेत परंतु संबंधित अधिकारी कारवाई करण्यास उदासीन आहेत.

म्हणून कडक उन्हामध्ये देखील आंदोलक मागे हटण्यास तयार नाहीत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लक्ष घालून मार्ग काढावा अशी चर्चा डाव्या चळवळीतील पक्षामध्ये आहे. २३ मार्च शहीद दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा केला भीम जयंती देखील येथेच साजरी करण्यात येईल असे माकपच्या वतीने घोषित केले आहे. आंदोलणाचे नेतृत्व सिटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.श्याम सरोदे आदिजन करीत आहेत. मागण्या मान्य होणार नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
