
नांदेड। दारिद्र्य, गरिबी याचा बाऊ न करता परिश्रम करण्याची जिद्द बाळगून अभ्यास करा याच कठोर परिश्रमाच्या बळावरच यशाची बाग फुलते. त्यामुळे आपण अनाथ आहोत, आपल्या पाठीशी कोणाचेही बळ नाही अशा विवंचनेत न अडकता यशाचा मार्ग धोपट करण्यासाठी नियोजनबद्धरित्या परिश्रम घ्या. कारण प्रचंड दबावाखाली हिरा तयार होतो. आणि असे हिरे सुमन बालगृहातून घडावेत, अशी सदिच्छा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी व्यक्त केल्या.


जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सुमन बालगृहातील मुलांचा वाढदिवस साजरा करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, कार्याध्यक्ष संतोष पांडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा सरचिटणीस राम तरटे यांच्या पुढाकारातून सुमन बालगृहातील चार मुलींचा वाढदिवस एकाचवेळी साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे मुलांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, डॉ. दागडीया. पत्रकार परिषदेचे विभागीय संघटक प्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरवाडे, सुमन बालगृहाचे संचालक दिनकर, पत्रकार संघाचे पदाधिकारी गजानन कानडे यांच्यासह संयोजक तथा जिल्हा सरचिटणीस राम तरटे यांची उपस्थिती होती.


चारही मुलींचा वाढदिवस उत्साहात साजरा करीत पोलीस अधिक्षकांनी त्या निरागस मुलींना केक भरवत आशीर्वाद दिला. सुमन बालगृहात यानिमित्त आगळे-वेगळे आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. चिमुकल्या मुलींनी सादर केलेले भजन आणि चित्रपट गीतातील नृत्याने उपस्थित भारावले. सुमन बालगृहात यापूर्वी असंख्य नागरिकांनी व दानशूरांनी आपले वाढदिवस, नातेवाईकांच्या पुण्यतिथी, पुढाऱ्यांचे वाढदिवस अथवा जयंत्या साजया करून मुलींना जेवणाची पंगत दिली; परंतु पहिल्यांदाच तेथील मुलींचा वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव संकल्प नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने केला. फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा दुसरा महिना होता.


यावेळी मुलींना आशीर्वाद देतांना पोलीस अधीक्षक म्हणाले की, आपण बालगृहात आहोत म्हणजे कमजोर आणि कमकुवत आहोत, असा न्यूनगंड बाळगू नका. प्रचंड दबावाखाली हिरा तयार होत असतो आणि तो सर्वश्रेष्ठ ठरतो. तुमची परिस्थिती नाजूक असली तरी दिनकरसारखे पालक आपल्या पाठीशी आहेत. अनेक दानशूर आपल्या पाठीशी आहेत. भविष्यात येथे ज्या काही मुलभूत सुविधा लागतील त्या देण्यासाठी आपणही पुढाकार घेऊ, असा विश्वास देतांना पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी येथील मुलींच्या जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र देत आशेचा किरण जागवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस राम तरटे यांनी केले. सुमन बालगृहाची भूमिका आणि आभार दिनकर यांनी मानले.
