नायगांव, रामप्रसाद चन्नावार। अमर बलिदान दिनाच्या पावन पर्वावर पंजाब मधील खटकर कालन येथे अलोट गर्दीत रंगलेल्या भव्य सांस्कृतिक सोहळ्यात नरसी येथील प्रतिभावंत गायक शाम गायकवाड याने आपल्या दमदार गायकीने रसिक-श्रोत्यांची मने जिंकली.” मेरा रंग दे बसंती चोला ” या गाण्यावर उपस्थितांना अक्षरशः थिरकायला लावत पंजाबचा कलामंच गाजविणा-या नरसीच्या या कसदार गायकाचे कौतुक होत आहे.
गायकीच्या विविध पैलूंचे शिक्षण घेतलेल्या शाम गायकवाड याने नरसीसह ग्रामीण क्षेञातील अनेक सुप्रसिद्ध उत्सव तसेच समारंभात आपल्या सुमधूर गायनाने रसिकांची वाहवा मिळवली आहे.देशभक्तीपर गीते, कव्वाली, लोकगीते व मिमिक्री यामध्ये देखील त्यांचा जबरदस्त हातखंडा आहे.
गोड गळ्याचा सुमधूर गायक असलेल्या शाम गायकवाड यांना शहीद दिनानिमित्त २३ मार्च रोजी पंजाब मधील खटकर कालन येथे शहीद भगतसिंह म्युझियम मध्ये येथे जय भारत माता सेवा समितीचे अध्यक्ष ओम मल्लिनाथ महाराज यांच्या उपस्थितीत आयोजित देशभक्तीपर समारंभात निमंञीत करण्यात आले होते.या संधीचे सोनं करत गायकवाड यांनी सुरेल गीतांच्या माध्यमातून शहीदांच्या स्मृती जागवल्या.
शहीद जवानांना सांगितिक आदरांजली अर्पण करतांना या भव्य दिव्य सांस्कृतिक सोहळ्यातील विशाल कलामंचावर प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने गायक शाम गायकवाड यांनी रंग दे बसंती चोला यासह इतर गीते सादर करुन रसिकांची दाद मिळवली.गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यातही शाम गायकवाड यांने बहारदार प्रदर्शन केले होते.यानिमित्ताने गायक शाम गायकवाड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.