
उस्माननगर, माणिक भिसे। टेंभुर्णीकडून नांदेड कडे जाणाऱ्या भरधाव वेगातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मारतळ्याकडुन गोळेगाव कडे येणाऱ्या दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाल्याची घटना २७ मार्च रोजी कौठा ते मारतळा रोडवर गोळेगाव ता. लोहा शिवारात घडली.


ताकबिड ता. नायगाव येथील रहिवाशी असलेला राजेश्वर बालाजी गंगातीरे (वय २५ वर्ष) हा नांदेड शहरातून आपल्या आईला दुचाकीवरून आपल्या आजोळी उमरा ता. लोहा येथे सोडून परत नांदेड कडे निघाला मात्र दहीकळंबा ता. कंधार येथे त्याच्या नातेवाईकाचे लग्न होते तेंव्हा आपण लग्न सोहळ्यात जावे म्हणून तो परत मारतळा ते हळदा मार्गाने आपली दुचाकी क्रमांक एम एच २६ व्हि.आर.१५३२ यावरून लग्नाला जात असताना नांदेड आगाराची टेंभुर्णीहून नांदेड कडे येणारी बस क्रमांक एम एच २०बि.एल.१६४९ हि भरधाव वेगात येत होती.


दरम्यान बस आणी दुचाकीची धडक होऊन यात राजेश्वर गंगातीरे ह्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, या घटनेची माहिती मिळताच उस्मान नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पीएसआय सुनील पल्लेवाड, जमादार रंगनाथ भारती यांनी अपघात स्थळी भेट देत पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविले.


नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या संकल्प हेअर कटिंग सलून मध्ये हा तरुण रोजंदारीवर काम करत होता त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ दोन बहिणी असा परिवार असून ते नांदेड शहरात वास्तव्यास होते. दरम्यान या प्रकरणी उस्मान नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली नव्हती.
