
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। सध्या नायगाव येथे कार्यरत असलेले तहसीलदार गजानन शिंदे सन २०१९ मध्ये हिंगोली येथे असतांना झालेल्या धान्य घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्यात आल्यानंतरही वसुलीपात्र रक्कम न भरल्याने शिंदे यांच्यासह २० अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या विरोधात बुधवारी पहाटे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा नोंद होणार असल्याची कुणकुण लागताच आठ दिवसापूर्वीच तहसीलदार गजानन शिंदे रजा घेवून भुमिगत झाले आहेत.


नायगाव येथे कार्यरत असलेले तहसीलदार गजानन शिंदे यांचीही कारकीर्द वादग्रस्त ठरत असून. त्यांना कशाचीही भिती राहीली नाही. कारण सर्वच अधिकारी भ्रष्ट असल्याने माझे काहीही होणार नाही या अविर्भावात मोठ्या प्रमाणात गौण खनिज माफीयांच्या घशात घालून शासनाचे लाखो रुपयाचे नुकसान केले आहे. पण हिंगोली येथे दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या कारकीर्दीवर काळा डाग लागला आहे.


मागच्या आठ दिवसापुर्वी तहसीलदार गजानन शिंदे अचानक दिर्घ रजा घेतल्याने नायगाव येथे उलटसुलट चर्चेचा उधाण आले होते. कारण त्यांनी हिंगोली जिल्ह्यात असतांना एकवेळ निलंबित झाले होते तर आनेक कारनामेही केले होते. त्यामुळे काहीतरी मोठी भानगड आहे असे सर्वांनाच वाटत होते तर एका प्रकरणात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. याबाबत हिंगोली येथील तहसील कार्यालयात माहिती घेतली असता प्रकरण कारवाईच्या टप्प्यात असल्याची माहिती मिळाली होती.


कारवाई होणार असल्याची कुणकुण लागताच तहसीलदार गजानन शिंदे यांनी दि. २३ मार्च रोजी रजा घेवून भुमिगत झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातून जानेवारी २०१९ ते जुलै २०१९ या कालावधीत ऑफलाईन धान्य वाटप करताना स्वस्त धान्य दुकानदारांना अतिरिक्ति धान्याचे वाटप केले. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सुमारे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे अतिरिक्त धान्य वाटप झाल्याचे स्पष्ट झाले होते.

यामध्ये हिंगोली तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानदारांचा समावेश होता. त्यानंतर पुरवठा विभागाने त्यांना नोटीस देऊन अतिरिक्त वाटप झालेल्या धान्याची रक्कम भरण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार काही जणांनी धान्याची रक्कम भरणा केली आहे. दरम्यान, यामध्ये ३३ लाख रुपयांची वसुलपात्र रक्कम भरण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले.

यावरून आज पहाटे परिविक्षाधिन तहसीलदार हिमालय घोरपडे यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी तत्कालीन तहसीलदार (सध्या नायगाव येथे कार्यरत) गजानन शिंदे, अव्वल कारकून कैलास वाघमारे, इम्रान पठाण, बी. बी. खडसे यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदार पी. आर. गरड, ज्ञानेश्वर मस्के, विनोड आडे, एस. के. पठाण, डी. एम. शिंदे, मिलींद पडघन, गणाजी बेले, गोपाल तापडीया, डी. बी. चव्हाण, गजानन गडदे, गोविंदा मस्के, पतींगराव मस्के, तालुका खरेदी विक्री संघ दुकान चालकासह तीन महिला दुकानदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, पोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे, जमादार अशोक धामणे स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.