Monday, May 29, 2023
Home देश-विदेश जी-२० च्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या तत्त्वानुसार सर्वांनी एकत्रितपणे एका उज्ज्वल भविष्याची उभारणी करूया- जीजेईपीसीच्या अध्यक्षांचे आवाहन -NNL

जी-२० च्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या तत्त्वानुसार सर्वांनी एकत्रितपणे एका उज्ज्वल भविष्याची उभारणी करूया- जीजेईपीसीच्या अध्यक्षांचे आवाहन -NNL

by nandednewslive
0 comment

मुंबई| भारतीय हिरे उद्योगाने आज, जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्य गटाच्या (TIWG) च्या प्रतिनिधींना भारत डायमंड बोर्स (BDB) या मुंबईतील हिरे व्यापार केंद्राला भेट देण्यासाठी आमंत्रित केले होते.

जी 20 प्रतिनिधींना भारत डायमंड बाजार परिसरातील जागतिक दर्जाच्या सुविधांची माहिती देण्यासाठी एक विशेष फेरी आयोजित करण्यात आली होती. या प्रतिनिधींनी मुंबई डायमंड मर्चंट्स असोसिएशन (MDMA) अर्थात मुंबई हिरे व्यापारी संघटना, इंडिया डायमंड ट्रेडिंग सेंटर (IDTC), अर्थात भारत हिरे व्यापार केंद्र, जेम अॅण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) यांची कार्यालये, जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (GII), प्रेशियस कार्गो कस्टम क्लीयरन्स सेंटर (PCCCC), तसेच सुरक्षा मुख्यालय आणि नियंत्रण केंद्र या ठिकाणी भेट दिली. हिऱ्यांचा व्यापार आणि त्याच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी, जी 20 प्रतिनिधींनी मोहित डायमंड, श्री रामकृष्ण एक्सपोर्ट्स, महेंद्र ब्रदर्स, व्हीनस ज्वेल, फाईनस्टार ज्वेलरी ॲण्ड डायमंड्स, अंकित जेम्स ॲण्ड धर्मानंदन डायमंड्स या ठिकाणी भेट दिली.

जी 20 प्रतिनिधींना त्यांच्या भेटीदरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि रोजगार निर्मितीमध्ये हिरे उद्योगाने दिलेल्या महत्वाच्या योगदानाची माहिती देण्यात आली. हा उद्योग केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात निर्माण करत असलेल्या संधींवर यावेळी भर देण्यात आला. भारतीय हिरे उद्योग हा कुशल कारागिरी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मजबूत परिसंस्था यासाठी ओळखला जात असून, त्यामुळे त्याने जागतिक हिरे उद्योगात महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे. या भेटीमधून, जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्य गटाच्या (TIWG) च्या प्रतिनिधींना भारतीय हिरे उद्योगाची क्षमता आणि जागतिक अर्थव्यवस्थेमधील त्याची भूमिका प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.

याप्रसंगी बोलताना बीडीबीचे अध्यक्ष अनुप मेहता म्हणाले की, “भारत डायमंड बोर्स या संस्थेला अभिमानाने जागतिक हिरे केंद्र असे संबोधले जाते. बोर्स ही हिरे क्षेत्रातील काही अत्यंत मोठ्या व्यापारी संस्थांसह सुमारे अडीच हजार हिरे व्यापाऱ्यांचे एकत्रीकरण करण्यात आलेली संस्था आहे.” “सामान्यपणे भारतीय हिरे उद्योगाकडे आणि विशेष करून बीडीबीकडे कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाची वैभवशाली परंपरा आहे. आमच्या सीएसआर उपक्रमांमध्ये आरोग्य, शिक्षण, स्वास्थ्य, क्रीडा तसेच लोककल्याण अशा विविध क्षेत्रांतील उपक्रमांचा समावेश आहे,”.

जीजेईपीसीचे अध्यक्ष विपुल शाह म्हणाले की, “‘जगाचा जवाहीर’म्हणून नावाजलेल्या भारत देशाकडे दागिने घडविण्याची पाच हजार वर्षांची समृद्ध परंपरा आहे. या क्षेत्रातील कौशल्ये आणि तज्ञता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करण्यात आली आहेत आणि आज, आपले कुशल कारागीर त्यांची अतुलनीय कारागिरी, उत्कृष्ट डिझाईन्स याकरिता सुप्रसिद्ध आहेत आणि त्यांनी जागतिक पातळीवर ओळख देखील मिळवली आहे. भारतातील दागिने उद्योग विविध संस्कृती, देश आणि जनता यांना जोडणाऱ्या सेतुचे काम करतो आणि जगभरातील लाखो ग्राहकांना आनंद आणि समाधान देतो.”

“भारतीय रत्ने आणि दागिने उद्योगाचे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान आहे. या क्षेत्रात 5 दशलक्ष व्यक्ती कार्यरत असून भारताच्या एकूण व्यापारी निर्यातीत या क्षेत्राचा 10 टक्के वाटा आहे. रत्ने आणि दागिने तयार करणारे समूह म्हणून देशातील 390 जिल्हे निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये दहा लाखांहून अधिक रत्ने आणि दागिने निर्मिती एकके कार्यरत आहेत. भारताच्या निर्यात क्षेत्राची भरभराट होत असून दरवर्षी देशातून 40 अब्ज डॉलर्सची निर्यात होत आहे. आपला देश अमेरिका, युरोप,मध्यपूर्वेतील देश, आशिया आणि इतर अनेक देशांसह संपूर्ण जगभरात दागिने निर्यात करत आहे,”.

या प्रसंगी उपस्थित असलेल्या जी-20 प्रतिनिधींना श्री. शाह यांनी भारतीय रत्ने आणि दागिने क्षेत्राशी व्यापार वृद्धीच्या संधींचा शोध घेण्यासाठी तसेच एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य या जी-20च्या ध्येयवाक्याचा भाग म्हणून एकत्र येऊन उज्ज्वल भविष्य उभारणीसाठी आमंत्रित केले. “हा चैतन्यमयी उद्योग अधिक विकसित करण्यासाठी एक देश म्हणून आम्ही जगभरातील आमच्या भागिदारांसह काम करण्यास सज्ज आहोत,” श्री. शाह म्हणाले.

भारत डायमंड बोर्स (BDB) विषयी – भारत डायमंड बाजार हे जगातील हिरे व्यापाराचे सर्वात मोठे केंद्र असून, मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागातील 20 एकर क्षेत्रावर पसरलेल्या या बाजारात 2500 पेक्षा जास्त कार्यालये आहेत.

भारतीय हिरे उद्योग हा कापलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांचा व्यापार करणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश असून, भारतामधून दरवर्षी 23 अब्ज अमेरिकी डॉलर्स (USD) किमतीच्या हिऱ्यांची निर्यात होते. जगभरातील दागिन्यांमध्ये बसवलेल्या 15 पैकी 14 हिऱ्यांवर भारतात प्रक्रिया केली जाते. भारत, अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, आशिया आणि इतर अनेक देशांसह संपूर्ण जगाला हिरे आणि हिरे जडित दागिन्यांची निर्यात करतो.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सक्षम नेतृत्वाखाली, गेल्या अनेक वर्षांत या उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. सरकारच्या सततच्या पाठिंब्याने, मार्गदर्शनामुळे आणि व्यावहारिक व्यापार-अनुकूल धोरणांमुळे आज भारताने जागतिक स्तरावर रत्न आणि दागिन्यांच्या व्यापारात आघाडीचे स्थान प्राप्त केले आहे. देशाच्या एकूण व्यापारी माल निर्यातीमध्ये रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीचा वाटा तब्बल 10 टक्के इतका आहे. या उद्योगामध्ये 85 टक्के सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग (MSME) आहेत, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी असून, यामधून देशाच्या अर्थव्यवस्थेमधील या उद्योगांचे महत्व अधोरेखित होते.

शाश्वतता हा जागतिक दृष्ट्या आवश्यक विषय आहे हे या उद्योगातील जाणकारांना माहीत आहे आणि म्हणूनच या क्षेत्रातील उद्योजक आपली कार्बन पदचिन्हे कमी करून साधनसंपत्तीचे जतन करण्यासाठी नवी तंत्रज्ञाने आणि प्रक्रिया यांच्यात गुंतवणूक करत आहेत. दागिने उद्योग क्षेत्रातील कामगार, समुदाय आणि पृथ्वी ग्रह यांच्या कल्याणाप्रती योगदान देणे सुनिश्चित करण्यासाठी हा उद्योग नैतिक पद्धती आणि जबाबदार स्त्रोतांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

लोककल्याणकारी उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याची रत्ने आणि दागिने उद्योगाची परंपरा फार जुनी आहे. या क्षेत्राने सातत्याने सामाजिक जबाबदारीप्रती कटिबद्धता राखत, शिक्षण तसेच आरोग्यसेवा विषयक उपक्रमांना पाठिंबा दिला आहे तसेच नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदतकार्य केले आहे. दागिने घडविणाऱ्या अनेक प्रमुख कंपन्यांनी महिला सक्षमीकरण, बालकल्याण आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांसह समाजहिताच्या प्रश्नांच्या विस्तारित श्रेणीवर लक्ष केंद्रित केले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!