
नांदेड| येथील श्री स्वामी समर्थ पंचपदी मंडळ, दै.प्रजावाणी व रामभक्त गु्रप यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३० मार्च गुरुवारी पहाटे सहा वाजता कुसूम सभागृहात अयोध्येत होणार्या राम मंदिराच्या निर्माण कार्याचा आनंदोत्सव म्हणून रामनवमीच्या पर्वकाळावर प्रभू श्री रामचंद्रांच्या भक्तीगीत गायनाचा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


या कार्यक्रमाची संकल्पना-निर्मिती व निवेदन अॅड.गजानन पिंपरखेडे यांचे असून निर्मिती सहाय्य व दिग्दर्शन पत्रकार विजय जोशी यांचे आहे. तर छत्रपती संभाजीनगरचे राजेश भावसार हे संगीत संयोजनाची बाजू सांभाळणार आहेत. या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचे सुप्रसिध्द गायक पं.निरज वैद्य, संगीता भावसार व अदिती अभिनय रवंदे (गोसावी) यांचा सहभाग राहणार आहे. तर साथ संगतीसाठी छत्रपती संभाजीनगरचे जगदीश व्यवहारे (तबला), नितीन इंगळे (सिंथसायझर), ऑक्टोपॅड राजेश भावसार व हार्मोनियमसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कलावंत अभिनय रवंदे हे असणार आहेत.


या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे करणार असून, प्रमुख उपस्थिती डॉ.तेजस माळवदकर, सहा. आयुक्त समाज कल्याण नांदेड यांची असणार आहे. या प्रसंगी याज्ञवाल्क्य वेदपाठशाळेचे आचार्य वे.शा.सं.मनोजगुरु जोशी यांना विशेष निमंत्रित केले असून त्यांच्या उपस्थितीत वेद घोषात हा उद्घाटन सोहळा संपन्न होईल.


राम पहाट या कार्यक्रमाचे मुहूर्तमेढ या निमित्ताने नांदेडमध्ये रोवली जात असून, नांदेडकरांना या निमित्ताने एक दर्जेदार कार्यक्रम दरवर्षी ऐकावयास मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवप्रसाद राठी, राजेंद्र हुरणे, प्रा.सुनील नेरलकर, राजेश चांडक, शंतनू डोईफोडे, गोवर्धन बियाणी, सतीश माहेश्वरी, बापू दासरी, लक्ष्मीकांत बंडेवार, विजय जोशी आणि गजानन पिंपरखेडे यांनी केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य आहे.
