
नांदेड| आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या शूरवीरांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले त्यांचे स्मरण होणे सध्याच्या पिढीसाठी आवश्यक असल्याचे मत जय भारत माता सेवा समितीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. तसनीम पटेल यांनी व्यक्त केले.


जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीच्या वतीने पंजाब राज्यातील शहिद भगत सिंघ यांच्या जन्मगावी शहीदांच्या कुटुंबियांचा सन्मान पुज्य मल्लीनाथ महाराज निरगुडी यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.


यावेळी मंचावर शहीद भगतसिंघ यांचे पणतू यदवेंद्रसिंघ संधु, त्यांची आई व पत्नी, शहीद चंद्रशेखर आजाद यांच्या परिवारातील सदस्य अमित आजाद तिवारी, शहीद राजगुरु यांच्या परिवारातील सत्वशील राजगुरु, शहीद अश्फाकउल्ला खान यांच्या परिवारातील अलकउल्ला खान, शहीद उधमसिंघ यांच्या परिवारातील हरपालसिंघ सुनम, शहीद सुखदेव यांच्या परिवारातील अशोक थापर, फिरोजपूर येथील सोमेशजी सरपंच, हरयाणा येथील चांदराम शर्मा, प्रवक्ते ऍड. वैजनाथ झळकी, उपाध्यक्ष शहाजीराव पाटील, मेहताब पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.


पुज्यनीय मल्लीनाथ महाराज निरगुडी संस्थापक अध्यक्ष असलेल्या जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीच्या वतीने दरवर्षी शहीदांचा सन्मान तथा स्मरणार्थ भव्यदिव्य सोहळा आयोजित केला जातो. यापूर्वी बंगळुरु, तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली येथे हे सोहळे झाले आहेत. स्वातंत्र्यवीरांबाबतची कृतज्ञता नेहमी सर्व भारतीयांमध्ये असावी याकरीता मल्लीनाथ महाराज यांचे कार्य सुरु आहे.

पंजाब राज्यातील खटकर कालन येथील राज पॅलेस येथे झालेल्या अमर बलिदान दिवस सोहळ्यात शहीदांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध राज्यातून आलेल्या देशभक्तांची मोठी उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यातील नरसीचे सुपूत्र श्याम गायकवाड यांनी देशभक्तीपर गीते गाऊन उपस्थितांची मने जिंकली. आगामी काळात देखील जय भारत माता सेवा समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतील अशी माहिती समितीचे राष्ट्रीय सदस्य सिद्धार्थ तलवारे यांनी दिली आहे.
