
नांदेड| श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा सबंध देशभर साजरा होत असताना नांदेडच्या श्री स्वामी समर्थ पंचपदी मंडळ व रामभक्त ग्रुपच्या वतीने आज राज्यातील पहिल्या राम पहाट या आगळ्यावेगळ्या संगीत व भक्तीगित मैफिलीला कुसूम सभागृहात नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकापेक्षा एक सरस भक्ती गितांनी ही मैफल चांगली रंगली. रसिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने वेगवेगळ्या गितांवर नृत्य करुन दाद दिली.


येथील श्री स्वामी समर्थ पंचपदी मंडळ, दैनिक प्रजावाणी व रामभक्त गु्रप यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.३० मार्च गुरुवारी पहाटे सहा वाजता कुसूम सभागृहात रामनवमीच्या पर्वकाळावर प्रभू श्री रामचंद्रांच्या भक्तीगीत गायनाचा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची संकल्पना-निर्मिती व निवेदन अॅड.गजानन पिंपरखेडे यांची होती. निर्मिती सहाय्य व दिग्दर्शन पत्रकार विजय जोशी यांचे होते. तर छत्रपती संभाजीनगरचे राजेश भावसार यांनी संगीत संयोजनाची बाजू सांभाळली.


या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचे सुप्रसिध्द गायक पं.निरज वैद्य, संगीता भावसार व अदिती अभिनय रवंदे (गोसावी) यांचा सहभाग होता.तर साथ संगतीसाठी छत्रपती संभाजीनगरचे जगदीश व्यवहारे (तबला), नितीन इंगळे (सिंथसायझर), ऑक्टोपॅड राजेश भावसार व हार्मोनियमसाटठी महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कलावंत अभिनय रवंदे यांनी उत्कृष्ट संगीतसाथ दिली.


या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.तेजस माळवदकर, सहा. आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. श्रीरामांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी याज्ञवालक्य वेदपाठ शाळेचे आचार्य वे.शा.सं.मनोजगुरु जोशी पेठवडजकर यांनी व त्यांच्या सहकार्यांनी सुरुवातीला वेद घोष केला. त्यानंतर नीरज वैद्य, संगीता भावसार, अदिती अभिनय रवंदे यांनी एकापेक्षा एक सरस गिते व भक्तीगिते सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. यात नादातूनी या नाद निर्मितो, ठुमक चलत रामचंद्र, ध्यान लागले रामाचे, रामनाम ज्याचे मुखी, रघुपती राघव राजाराम, दशरथा दे हे पायसदान, कौशल्येचा राम, बाजे रे मुरलीया, पायोजी मैने रामरतन, अंजनीच्या सुता व बनायेंगे मंदिर या व अन्य रचना सादर करुन वातावरण मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पत्रकार विजय जोशी यांचे चिरंजीव विपूल जोशी यांनी व्यासपीठावर येवून आरंभ है प्रचंड बोले, मस्तको के झुंड हे गुलाब या चित्रपटातील पियूष मिश्रा यांनी गायिलेले गीत मोठ्या जोषात व जल्लोषात सादर केले. अत्याधुनिक ट्रॅक्स संगीतावर त्यांनी या सादर केलेल्या गीताला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे नेटके निवेदन करताना अॅड.गजानन पिंपरखेडे यांनी प्रभू रामचंद्रांच्या विविध आठवणींना उजाळ देवून कार्यक्रमाच्या पाठीमागची भूमिका विशद केली. उद्घाटकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गझलकार बापू दासरी यांनी केले.

यावेळी बोलताना समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिकांना वेगवेगळ्या उपक्रमांची पर्वणी नांदेडकरांना मिळत असते. आजच्या कार्यक्रमाने त्यात आणखी भर घातली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवप्रसाद राठी, राजेंद्र हुरणे, प्रा.सुनील नेरलकर, राजेश चांडक, शंतनू डोईफोडे, गोवर्धन बियाणी, सतीश माहेश्वरी, बापू दासरी, लक्ष्मीकांत बंडेवार, विजय जोशी आणि गजानन पिंपरखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे परकंठे, स्वरसभेचे डॉ.दि.भा.जोशी, शारदा भवन शिक्षण संस्थेचे उदय निंबाळकर, डॉ.सुरेश दागडीया, डॉ. सुशील राठी आदी मान्यवर उपस्थित होते.
