
नांदेड| नांदेड- मुदखेड रोडवरील मुगट गावाजवळ आज भरधाव मालवाहू ट्रक व ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. इसार पेट्रोल पंपाशेजारी वळण रस्त्यावर झालेल्या या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर इतर 8 जण गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.


पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपघाताची माहिती समजताच त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली. जखमी व्यक्तींबाबत विचारपूस करुन त्यांना तातडीने योग्य ते उपचार उपलब्ध करुन देण्याबाबत अधिष्ठाता डॉ. पी.टी. जमदाडे यांना सूचना दिल्या आहेत.


मृतांमध्ये ऑटो मधील सरोजा रमेश भोई ( वय ४0, रा मेहकर. जिल्हा बुलढाणा), गाली कल्याण भोई ( वय २४ रा.गेवराई जिल्हा बीड), जोयल कल्याण भोई ( वय ७ महिने), पुंडलिक बळीराम कोल्हटकर ( वय ७0 रा. सावरगाव माळ , भोकर, नांदेड) आदींचा जागीच मृत्यू झाला. तर विद्या हाटकर ( वय ३७ रा. इजळी ता. मुदखेड) या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे. तर अपघातातील गंभीर जखमींना नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.


जखमींवर सध्या उपचार सुरू आहे. जखमीमध्ये लक्ष्मी राजू गोडमंचे वय वर्षे 30, दिपा महेश गोडमंचे वय वर्षे 20, पुजा गोडमंचे वय वर्षे 40, सोहम हटकर वय वर्षे 10 , सोनाक्षी हटकर वय वर्षे 13 , शोभा भांगे वय वर्षे 35, पल्लवी विजय शामराव वय वर्षे 30, शे मोईद्दीन शे जिम्मीसाब वय वर्षे 45 यांचा समावेश आहे.

मुदखेड शहरातून दहा ते बारा जण कामासाठी ऑटोने नांदेडला येत होते. मुगट शिवारा जवळील एस्सार पेट्रोल पंपा जवळ येताच समोरून सिमेंटने भरलेल्या ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात एवढा गंभीर होता की ट्रकच्या धडकेनंतर ऑटो पलटी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू पावणाऱ्यामध्ये एका सात महिन्याच्या बालिकेचा समावेश आहे.