
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील श्रीराम मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, श्रीसाई मंदिर, श्री परमेश्वर मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वच देवी देवतांच्या मंदिरात चैत्र शुद्ध नवमी दि.३० मार्च रोज गुरुवारी मर्यादापुरुषोत्तम, अयोध्यापती प्रभू श्री रामचंद्राचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने येथील बजरंग दल – विश्व् हिंदू परिषद व सर्वच संघटनांच्या युवकांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून जय श्रीराम… जय…जय…श्रीराम च्या नामघोषात, भारूढ भजनी मंडळ, फटाक्याची आतिषबाजी व संगीताच्या तालावर सायंकाळी ३ वाजता भव्य शोभा यात्रा काढली. ४ तास चालेल्या या शोभायात्रेमुळे वाढोणा शहरात सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान शोभा यात्रेत हिंगोली लोकसभा खा. हेमंत पाटील, शेतकरी नेते तथा शिवसेना माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर, आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.


पौराणिक कथेनुसार श्री रामनवमीच्या दिनी त्रेतायुगात महाराज दशरथांच्या घरी विष्णूचा अवतार असलेल्या मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला होता. रावणाचा अंत करण्यासाठी रामाचा जन्म झाला. त्यामुळे आजही सुशासन, मर्यादा, सदाचारी म्हणून प्रभू श्रीरामचंद्राला पूजिले जाते. त्याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरासह तालुकाभरात मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीराम जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला. शहरातील सर्वच देवी – देवतांच्या मंदिरात राम नामाचा जप करीत प्रभू श्री रामचंद्राच्या जीवन चरित्रावर आधारित भक्तीगीते महिला – पुरुष भजनी मंडळीनी सादर केली.


हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरापासून शहरातील मुख्य रस्त्यावरून जय श्रीराम… जय .. जय… श्रीराम…. प्रभू श्री रामचंद्र कि जय.. सियावर रामचंद्र कि जय.. जय श्रीराम नावाचा जयघोष करीत भव्य शोभा यात्रा काढली होती. यावेळी युवकांनी जय श्रीराम नाव असलेले भगवी टोपी डोक्यावर परिधान करून हाती प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा असलेले भगवे झंडे घेऊन शेकडो युवक शोभा यात्रेत सहभागी झाले होते. सुरुवातीला श्री परमेश्वर मंदिरात महाविरचंद श्रीश्रीमाळ, श्याम रायेवार, रामभाऊ ठाकरे, आशिष स्क्वान, प्रवीण जन्नावार, सुधीर उत्तरवार, कमलाकर दिक्कतवार, बाळूआणा चवरे, रामदास रामदिनवार, समितीचे अध्यक्ष शुभम गाजेवार, आदींसह अनेक मान्यवरांच्या हस्ते भव्य पुष्पहार प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेला अर्पण करून आरती व पूजन करण्यात आले. यावेळी संतोष गाजेवार, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, बजरंग दल संयोजक गजानन चायल, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, सुधाकर चीटेवार, राम नरवाडे, उदय देशपांडे, श्रीनिवास चीद्रावार, विठ्ठल ठाकरे, गजानन हरडपकर, दिनेश राठोड, राजू बोडके, डॉ वानखेडे, ज्ञानेश्वर शिंदे, वामनराव मिराशे, योगेश चिलकावार, यांच्यासह शहरातील व्यापारी, कर्मचारी, युवकांसह अनेकांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.


त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने श्रीरामचंद्राची भव्यदिव्य १२ फूट उंच प्रतीकात्मक मूर्तीची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. रैलीच्या सुरुवातीला भगवे ध्वज हाती धावून युवक, ढोल ताशा, त्यामागे घोड्यावर स्वर भागवाधारी युवक, त्यानंतर सरसम, पळसपूर, सिरंजनी येथिल भारूड भजनी मंडळ त्यामागे, प्रभू श्रीरामचंद्राच्या भक्तीगीते असलेले साउंड सिस्टीम व प्रभू श्रीरामाची प्रतिमा अश्या शिस्तबद्ध पद्धतीने शोभा यात्रा काढण्यात आली. दरम्यान शोभायात्रेत हिंगोली लोकसभा खा. हेमंत पाटील, शेतकरी नेते तथा शिवसेना माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर, आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

शोभा यात्रेत सामील झालेल्या रामभक्त युवकांसाठी सराफा लाईन, बजरंग चौक, कालिंका गल्ली, गणेश चौक, श्रीराम मंदिराजवळ थंड पेयजल व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील प्रसिद्ध वर्धमान मेन्स वेयरचे मालक आशिष जैन यांचेतर्फे सर्व रामभक्तांना आईस्क्रीम वितरित करण्यात आली होती. शहरातील चौकाचौकात अनेक नागरिक, व्यापाऱ्यांनी श्रीरामचंद्राच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. ठिक ठिकाणच्या नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत फटाक्याच्या आतिषबाजीत तर काहींनी पुष्पवृष्टी करून केले. त्यानंतर शोभा यात्रा बाजार लाईनीतून थेट गणेश चौक, श्रीराम मंदिराच्या मार्गाने श्री परमेश्वर मंदिरात परत आल्यानंतर रामजन्मोत्सव सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

शहरातील श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदाने पार पडला. दुपारी १२ वाजता प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. यावेळी आरती – पूजा करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शहरातील सधन शेतकरी भय्या बंडेवार यांच्या फार्महाउस वरील श्री साई मंदिरात विविध कार्यक्रमाने राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो महिला, पुरुष भक्तांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थित शेकडो महिला – पुरुषांनी श्रीसाई व प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची आरती करून दर्शन घेतले.

तालुक्यातील बोरगडी येथील हनुमान मंदिरात, सरसम येथील श्री कृष्ण मंदिरात, इंदिरा नगर साईबाबा मंदिरात, करंजी येथील महादेव मंदिरात, विरसनी येथील दत्त मंदिरात, वडगावला भैरवनाथ मंदिरात, पार्डीला साईबाबा मंदिरात, आणि सोनारी, पोटा, पारवा, कांडली, कार्ला, मंगरूळ, टेंभी, सिरंजणी, पळसपूर, कामारी, खैरगांव – कामारवाडी, सातशिव हनुमान मंदिरात, जवळगाव, खडकी, एकघरी, वाशी, चिचोंडी, सवना, वडगांव, आंदेगाव, आदीसह सर्वच गावातील मंदिरामध्ये भजन – कीर्तन अश्या भक्ती संगमात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांनी चॊख पोलीस बंदोबस्त लावून शांततेत रामनवमी साजरी होण्यासाठी परिश्रम घेतले.