
श्रीराम नवमी निमित्त रंगला ‘ कीर्तन संवाद ‘ -NNL
‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे। ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘कीर्तन संवाद ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .गुरुवार , ३० मार्च २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम पार पडला.
मधुश्री शेंडे आणि अवनी परांजपे या बाल कीर्तनकारानीं श्रीराम नवमी, रा मदास जयंतीनिमित्त प्रभावी आणि रसाळ असा कीर्तन संवाद सादर केला. श्रीमती अंजली कऱ्हाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.आशुतोष परांजपे(हार्मोनियम),केदार तळणीकर(तबला) यांनी साथसंगत केली.
संत एकनाथ महाराजांचा अभंग “गुरू परमात्मा परेशु” सादर करून, कीर्तनाच्या पूर्वरंगात दोघी बालकिर्तनकारांनी सद्गुरू महात्म्य विशद केले! तर पूर्वार्धात किर्तनाच्या आख्यानामध्ये समर्थ रामदास शिष्या वेणा स्वामी यांच्या जीवनावर आधारित कथाभाग दोघींनी अतिशय रसाळ आणि माधुर्य पूर्ण रित्या सादर केला, याला उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.कीर्तनाच्या मध्यंतरात पद कीर्तन सादर करण्यात येते , ते इयत्ता पहिलीतील बाल कीर्तनकार आर्या परांजपे हिने “समर्थ शिष्य कल्याण स्वामी यांचा अभ्यास” या विषयावर पद आणि कथा सादर केली.
‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली कऱ्हाडकर यांनी केले. हा कार्यक्रम विनामूल्य होता. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १५६ वा कार्यक्रम होता .