Monday, May 29, 2023
Home लेख चला, भरडधान्याचे महत्व जाणून घेऊया -NNL

चला, भरडधान्याचे महत्व जाणून घेऊया -NNL

by nandednewslive
0 comment

सध्या माणसाच्या आरोग्याबाबतच्या तक्रारी वाढतांना दिसत आहेत. स्थूलता, लठ्ठपणा, उच्च- रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे होणारे आजार, पचनसंस्थेचे आजार, अनुवांशिक नसलेले कर्करोग अशा आजारांनी घरात प्रवेश केला आहे. आपल्या भारतातील पारंपरिक तृणधान्य- भरडधान्याच्या उपयोगाद्वारे या समस्येवर उपाय शोधता येईल.

दुष्काळात तग धरणारे शेवटचे पीक म्हणजे तृणधान्य! अल्पभूधारक शेतकऱ्याला स्वतःच्या आरोग्यासाठी, त्याच्या गाई-ढोरांच्या वैरणासाठी, इंधनासाठी ते उपयुक्त आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, तसेच कमी पाण्यात होणारे हे पिक आहे.

मोठे तृणधान्य म्हणजे ज्वारी व बाजरी आणि छोटे तृणधान्य म्हणजे नाचणी, भगर, राळ, कोद्रो, सावा, वरी, छोटा सावा. छोट्या तृणधान्यांना विविध भागात नागली, मोर, भादली, कांगणी असे वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पूर्वी ज्वारी, बाजरी, नाचणी ही पिके खळ्यात मळणे या प्रक्रियेने तयार केली जात असे. पण छोट्या तृणधान्याचे वरील आवरण, टणक असल्यामुळे भरडावे किंवा कांडावे लागत असे आणि म्हणून यांना भरडधान्ये म्हटली जातात. काळाच्या ओघात शेतात हे पीक कमी घेतले जावू लागले. तसेच भरडणे व कांडणे ही प्रक्रिया किचकट असल्यामुळे मनुष्याचा आहारातून अशी ही मूल्यवान तृणधान्य नाहीशी झाली.

समाजात आहार व आरोग्याविषयी जागरूकता आल्याने भरडधान्य आता ताटात दिसू लागले आहे. भारताच्या प्रयत्नाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणूनही साजरे केले जात असल्याने आणि त्यासाठी जनजागृतीचे विवध उपक्रम आयोजित केले जात असल्यानेदेखील नागरिकांना भरडधान्याचे महत्व कळले आहे.

तांदूळामध्ये असणारा ०.२ ग्रॅम प्रति ग्रॅम तंतू व भगरमध्ये असणारा १०.१ ग्रॅम प्रति १०० ग्रॅम तंतू ही तुलना लक्षात घेतल्यास भरडधान्याचे महत्व लक्षात येते. आहारतंतू हे वजन नियंत्रित करणे, लठ्ठपणा कमी करणे, पोट साफ ठेवणे, पित्ताशयात खडे न होऊ देणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे, यासाठी उपयुक्त असतात. तंतू हे इन्शूलिनचा प्रतिसाद वाढविण्याचे कार्य करतात, त्यामुळे साखर नियंत्रित रहात असल्याने या धान्यांना जगभरात मागणी आहे.

लहान मुली मुलांपासून ते पौगडावस्था, गरोदर महिला, स्तनदा माता यांच्यामध्ये लोहाची कमतरता असते. लहान मुलांमध्ये मेंदूच्या वाढीसाठी उपयुक्त असो लोह आहारात समाविष्ट असणे जरुरी आहे. बाजरीतील ८ ग्रॅम प्रति १०० ग्रॅम, राळमधील ६.३ ग्रॅम प्रति १०० ग्रॅम लोह व तुलनेत तांदूळातील १ ग्रॅम प्रति १०० ग्रॅम असणाऱ्या लोहाचे प्रमाण लक्षात घेतल्यास आहारात भरडधान्याची उपयुक्तता लक्षात येते.

शरीराच्या प्रत्येक पेशीला कार्य करण्यासाठी लागणारे कॉल्शिअम तसेच हाडांच्या वाढीसाठी व हाडे मजबूत राहण्यासाठी लागणारे कॉल्शिअम हे नाचणीमध्ये ३४४-३६४ मिलीग्रॅम प्रति १०० ग्रॅम आहे. नाचणी आहारातून बाजूल सारल्याने कॅल्शिअमच्या पूर्ततेसाठी औषधे घ्यावी लागतात. डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले केरोटिन बाजरीमध्ये असते.

तृणधान्य- भरडधान्य मध्ये असणारी साखर ही जटील कर्बोदके स्वरुपाची असल्याने रक्तात विरघळण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे मधुमेहग्रस्त व्यक्तिमध्ये साखर नियंत्रित करण्यात व वजन कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. या धान्यांमध्ये असणारे ॲन्टिऑक्सिडंट पेशींना इजा होऊ देत नाही. तसेच कर्करोग प्रतिबंधूसाठी ॲन्टिऑक्सिडंटचे कार्य उपयुक्त असते. तृणधान्य- भरडधान्य यामध्ये असणार ७ ते १२ टक्के प्रथिन हे स्नायू बळकटीकरण व शरीराच्या प्रक्रियामध्ये उपयुक्त असता.

जीवनसत्व, सूक्ष्मपोषकद्रव्ये युक्त असल्यामूळे शरीरातील पेशींची वाढ व कार्य व्यवस्थित राहते. व तसेच प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. मानसिक आरोग्य चांगले राहणे, झोप शांत लागणे यासाठी उपयुक्त आहेत. भरडधान्य खातांना त्यांना अगोदर कमीतकमी ६ तास भिजवून ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या तंतूत पाण्याचे शोषण होणे शरीरासाठी उपयुक्त आहे, यांच्यापासून पोळी-भाकरी, ठोसा, इडली, आप्पे, विविध प्रकारच भात, खिचडी, बिस्कीट , ब्रेड, पिझा बेस आपण बनवू शकता.

शासनाच्या कृषि विभागाने पौष्टिक तृणधान्याबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. विविध स्तरावर या धान्याचे महत्व समजावले जात आहे. एकीकडे आरोग्यासाठी उपयुक्त् असलेले हे धान्य लहान शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारे आहे. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने आणि आपल्या आरोग्यासाठीदेखील आपण आहारात तृणधान्य-भरडधान्याचा समावेश करूया…!

…….डॉ.अर्चना ठोंबरे, लेखिका वैद्यकीय व्यावसायिक आणि पौष्टिक अन्नधान्य विषयातील अभ्यासक आहेत

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!