
हिमायतनगर, अनिल मादसवार। विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे नदी काठावरील शेतकरी मुकी जनावरे व वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ईसापुर धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, आतापर्यंत या भागात पाणी पोहोचले नसल्याने वन्य प्राण्यांना आपल्या जीव धोक्यात टाकावे लागत असल्याचे चित्र दिसते आहे. असाच काहीसा प्रकार आज एका वानरा सोबत घडला असून, कुत्र्याच्या टोळक्याने वानरीवर हल्ला केला. यात एक वानरीन जखमी झाली असून, दरम्यान वानरीच्या पिल्लाला या भागातील शेतकऱ्याने वाचउन जीवदान दिले आहे. अश्या घटना टाळण्यासाठी तात्काळ पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.


एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे, त्यामुळे पैनगंगा नदी कोरडी पडली आहे. डबक्यात देखील पाणी राहिलं नसल्याने वन्यप्राणी व पशु पक्षांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. हिमायतनगर तालुक्यातील डोलारी परिसरातील शेतशिवारात आज दि. 01 एप्रिल रोजी दुपारच्या वेळी पाण्यासाठी भटकंती करताना आपल्या पिलासह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात येत आसलेल्या वाणरींवर कुत्र्याच्या टोळक्याने पाठलाग करून हल्ला केला. कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या वानरीचे कुत्र्यांनी लचके तोडले, यात वानरीन रक्तबंबाळ होऊन जखमी झाली. दरम्यान हा प्रकार लक्षात येतात या भागातील विलास आष्टकार व ईतर शेतकऱ्यांनी कुत्र्यांना हाकलून वानरीसह तिच्या चिमुकल्या पिल्यास वाचविले आहे.


याबाबतची माहिती वनविभागाला कळविण्यात आली असून, तात्काळ जखमी वानरीवर उपचार करण्यात यावे अशी मागणी केली आहे. वृत्त लिहीपर्यंत वनविभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पोहोचले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. एकूणच पैनगंगा नदी पात्र कोरडे ठक पडल्यामुळे वन्य प्राण्यांवर अशी भटकंती करण्याची वेळ आली असून, तात्काळ ईसापुर धरणातून पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात यावे. आणि मुकी जनावरे वन्यप्राणी व शेतकऱ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

