
नांदेड। डॉ. हंसराज वैद्य यांनी ‘असाध्य ते साध्य’ हे पुस्तक लिहिले आहे. या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी सत्य असलेला जीवनपट उलगडून दाखविला आहे. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये ते कसे घडले, त्यांची जिद्दी ही नव्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री डॉ. कमलकिशोर कदम यांनी केले.


‘असाध्य ते साध्य’ या डॉ. हंसराज वैद्य यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन दि.1 एप्रिल 2023 रोजी जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात करण्यात आले. याप्रसंगी कदम बोलत होते. 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलकिशोर कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून खा.प्रताप पाटील चिखलीकर, खा.हेमंत पाटील, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धवराव भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम, ज्येष्ठ समीक्षक प्रा.भु.द.वाडीकर, ज्येष्ठ साहित्यीक देवीदास फुलारी, डॉ.संजय कदम, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, प्रभाकर कानडखेडकर यांची उपस्थिती होती.


पुढे बोलताना डॉ. कमलकिशोर कदम म्हणाले की, डॉ. हंसराज वैद्य यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जसे आत्मचरित्र लिहिले, तसे नितळ आत्मचरित्र वैद्य यांनी लिहिले आहे. भगवान श्रीकृष्ण गुराखी होते. तसे वैद्य यांनी गुरे सांभाळले आहेत. हे ते यात प्रामाणिकपणे त्यांनी सांगितले आहे. आज-कालची नवी पिढी कुठलेही कष्ट न करता यश मिळण्याची अपेक्षा करतात. परंतु डॉ. हंसराज वैद्य यांचे आत्मचरित्र युवकांनी वाचले तर जीवनामध्ये यश संपादन करण्याचा मार्ग त्यांना मिळेल. त्यामुळे नव्या पिढीने हे आत्मचरित्र वाचून स्वतःच्या जीवनामध्ये यश मिळविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे कदम यांनी म्हणून वैद्य यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.


89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी अतिशय अभ्यासपूर्ण या पुस्तकावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, आपले जीवनचरित्र ‘असाध्य ते साध्य’ या पुस्तकाच्या माध्यमातून मांडताना स्वतःच्या गरीबीचा विचार केला नाही. सत्य बाजू त्यांनी मांडली आहे. बहुदा अनेकजण आत्मचरित्र लिहिताना बर्याच गोष्टी त्यात समाविष्ट करत नाहीत. परंतु त्यांनी चांगले आणि वाईट अनुभव अतिशय हालाखीची परिस्थिती, जीवनात आलेले चढ-उतार, गरीबीशी केलेला संघर्ष आणि पद्मश्री शामरावजी कदम यांच्या संस्कारातून, आई-वडिल यांच्या संस्कारातून कसे घडलो हे त्यांनी सांगितले आहे. संस्कृतीचा खरा नायक म्हणले तरी त्यांना वावगे ठरणार नाही. बहुधर्मीय त्यांचा लोकसंपर्क दिसून येतो. त्यांचे आत्मचरित्र प्रामाणिकतेच्या सर्व कसोटीवर उतरलेले दिसते. त्यांच्या सारख्या कार्याची समाजाला सध्या गरज आहे, असे सबनीस यांनी सांगितले.

खा. हेमंत पाटील यांनी डॉ.वैद्य हे निर्मळ मनाचे माणुस असून इतरांना काम करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तर खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी डॉ. हंसराज वैद्य यांनी अनेक पक्ष बदलले, मी पण बदलले परंतु मला लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळाली, कारण मी नेहमीच त्यांच्यापेक्षा वरचढ पक्ष निवडला, त्यामुळे यश मिळविता आले. पद्मश्री शामरावजी कदम यांचा सक्षम पद्धतीने वारसा ते चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. हंसराज वैद्य म्हणाले की, जीवनामध्ये माणुस अनेक प्रसंग विसरतो. परंतु आलेले अनुभव इतरांना मार्गदर्शक असतात असे माझे वडील म्हणायचे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यांत या माझ्या आत्मचरित्रातून माझा जीवनपट प्रामाणिकपणे मांडला आहे. शिकण्याची जिद्द असेल तर निश्चितपणे आपण शिकू शकतो. जीवनात कुठलीही गोष्ट असाध्य नसते, असे म्हणत त्यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला.

स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धवराव भोसले यांनी डॉ.वैद्य सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले. तर साहित्यीक देवीदास फुलारी यांनी आई-वडील, पत्नी, सासरे यांना प्रभावीपणे या आत्मचरित्रात उलगडून दाखविलेले आहे, असे ते म्हणाले. माजीमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी आशा पुस्तकाच्या माध्यमातून संस्कारीक पिढी घडू शकते. समाजासाठी हे पुस्तक प्रेरणादायी असून सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा पुस्तकातून बदल घडू शकतो, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत डॉ. संजय कदम यांनी केले व विस्तृतपणे डॉ. हंसराज वैद्य यांचा जीवनपट केलेले कार्य योग्य पद्धतीने मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुजाता जोशी-पाटोदेकर तर आभार प्रदर्शन डॉ. शीतल भालके यांनी केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.