
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार। हिमायतनगर कृषीउत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या रनधुमाळीला सुरूवात झाली आहे. आगामी निवडणूकीसाठी काँग्रेस, राष्ट्र वादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, व भारतीय जनता पार्टी आदींसह राजकीय पक्षानी जोरदार तयारी केली असून, १८ जागेसाठी येत्या २८ एप्रिलला प्रत्यक्षात मतदान होणार आहे. मतमोजनी २९ एप्रिलला होणार असून, मतमोजणी संपल्यानंतर लगेच निवडणूकीचा निकाल अर्थात विजयी उमेदवार घोषित केले जाणार आहेत.


हिमायतनगर कृषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी बराच विलंब झाला असून, मधल्या काळात प्रशासक हे बाजार समितीचा कार्यभार पहात होते. सत्ता बदलली की, त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यास संधी मिळत गेली. आता मतदानाच्या माध्यमातून विजय मिळविलेले. पदाधिकारी बाजार समितीत येणार असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय पदाधिकाऱ्यांकडून होतील अशी अपेक्षा आतापासूनच शेतकरी व्यक्त करीत आहेत.


येथील बाजार समितीतील निवडणूकीसाठी नव्याने जाहीर झाल्या प्रमाणे सर्वसाधारण ( ७ ), महिला ( २ ), इतर मागासवर्गीय ( १ ), विमुक्त व भटक्या जाती (१ ), व ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण ( २ ), अनुसूचित जाती/ जमाती (१ ), अर्थिक दुर्बल घटक ( १ ), यासह आडते, व्यापारी मतदार संघ, हमाल व मापाडी मतदार संघ असे एकूण १८ जागेसाठी मतदान होणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दि. २७ मार्च पासून सुरूवात झाली असून, येत्या ३ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. छाननी दि. ५ रोजी होणार असून ६ ते २० पर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. २१ ला निशाणी वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून २८ ला प्रत्यक्षात मतदान होणार आहे. २९ ला मतमोजनी नंतर लगेचच निकाल घोषित करण्यात येणार आहे.


दरम्यान काँग्रेस चे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी जवळगाव येथे आपल्या निवास्थानी कार्यकर्त्याची बैठक बोलावून उमेदवारांची चाचपणी केली आहे. राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी आहे. परंतू हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदार संघात एकमेकांचे परंपरागत प्रतिस्पर्धी राहत आलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर व काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यात फारसे सख्य नसल्याने आगामी बाजार समितीच्या निवडणुकीत आजी माजी आमदार एकत्र लढतील याची शाश्वती सध्यातरी देता येणार नाही.

भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हिमायतनगर बाजार समितीत चांगले लक्ष घातले असल्याने भाजपचे मोठे आवाहन आगामी निवडणुकीत राहणार आहे. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत बाजीगर ठरलेले बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते बाबुराव कदम कोहळीकर यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आगामी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने जोरदार तयारी चालविली असून कोण कितने पाणी मे हे निवडणूक निकालानंतरच समजेल, एवढे मात्र खरे.
