
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीची रणधुमाळी वेगाने सुरू झाली आहे. स्थानिकला काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वेगवेगळे कृषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची तयारी करीत आहेत. राज्यात ठाकरे गटाची शिवसेना व काँग्रेस आघाडी मध्ये एकत्र आहेत. मात्र हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदार संघात सध्यातरी वेगळे चित्र दिसून येत आहे. राज्यात आघाडी असली तरी हिमायतनगरात बिघाडी झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. काँग्रेस ने एकला चलोरेचा नारा लावला असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने राष्ट्रवादी व वंचितला सोबत घेवून निवडणूकीला सामोरे जाण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत जाहीर केला आहे.


हिमायतनगर कृषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा बिगूल वाजला असून येत्या २८ एप्रिलला मतदान होणार आहे. या बाजार समितीत ४८ ग्रामपंचायती असून, ३७७ मतदार आहेत. तसेच सेवा सहकारी सोसायट्या २२ असून, मतदारांची संख्या २७६ आहे. व्यापारी मतदारांची संख्या ३८९ , तर हमाल, मापाडी २०५ अशी मतदार संख्या आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी जवळगाव येथे काँग्रेस पदधिकारी व कार्यकर्त्याची बैठक बोलावून उमेदवाराची चाचपणी केली. तसेच ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही बालाजी विद्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्याची बैठक बोलावून चर्चा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह बैठकीला हजर होते. तसेच वंचित बहुजन आघाडीही आष्टीकरांच्या बैठकीला हजर होती.


दुसरीकडे भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान व भाजपाचे जेष्ठ नेते सुधाकर पाटील सोनारीकर यांनी ही जोरदार तयारी केली असून, त्यांना बाळासाहेबांची शिवसेना नेते बाबुराव कदम कोहळीकर यांची महत्वपूर्ण साथ मिळणार आहे. निवडणूकीचा आखाडा आता तापला असून, सर्वच पक्ष संघटना जिंकण्याच्या इराद्याने निवडणुकीत उतरल्या आहेत. एक महत्वपूर्ण बाब अशी ठरते की, हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात आमदार माधवराव पाटील जवळगावकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर हे एकमेकांचे परंपरागत प्रतिस्पर्धी राहत आले आहेत. राज्यात काँग्रेस, ठाकरे शिवसेना आघाडीत एकत्र असले, तरी हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत वेगळे चित्र पहावयास मिळत आहे.

