
कंधार, सचिन मोरे। लोहा- कंधार विधानसभा मतदार संघ म्हणजे माझी जन्मभूमी असून येथेच मी लहानाचा मोठा झालो. या जन्मभूमीचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही.या जन्मभूमी च्या विकासासाठी मी अहोरात्र मेहनत घेणार असून , लोहा – कंधार मतदार संघाच्या विकासासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकचे माजी स्थायी समिती चे सभापती एकनाथ दादा पवार यांनी दिली.


महाराष्ट्र ,आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून परिचित असलेल्या उमरज येथील संत नामदेव महाराज मठ संस्थानास एकनाथदादा पवार यांच्या माध्यमातून ४ कोटी ३६ लाख ४९ हजारांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मठ संस्थान व उमरज वासियांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी गावकऱ्यांच्या वतीने वाजत गाजत एकनाथराव पवार यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संत नामदेव महाराज मठ संस्थानच्या वतीने मठाधिपती संत एकनाथ नामदेव महाराज यांच्या वतीने एकनाथराव पवार यांचा शाल ,श्रीफळ ,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला . सत्कारानंतर माजी सरपंच मोतीराम पा तोरणे यांच्या घरी आयोजित गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.


पुढे बोलताना पवार म्हणाले कंधार ही संतांची भूमी असून या भागात कड्याचा शंभू महादेव ,वडेपुरी येथील रत्नेश्वरी मंदिर ,पानभोसी येथील गुरु नागेंद्र गयबी महाराज मठ संस्थान , डोंगरगावचे मठ संस्थान , कंधार येथील संत साधू महाराज मठ संस्थान यांच्यासह अनेक धार्मिक स्थळे लोहा-कंधार विधानसभा मतदार संघात असून त्यांचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही.त्या सर्व धार्मिक स्थळांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी आणून त्या धार्मिक स्थळांचा विकास करणारा असल्याचे पवार यांनी सांगितले. मी जात पात मानणारा कार्यकर्ता नसून सर्व जाती-धर्माच्या अठरापगड जातीला घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे .


या मतदारसंघातील अनेक तांडे विकासापासून वंचित असून त्या सर्व तांड्यांना निधी देऊन विकास घडवून आणू एकही तांडा विकासापासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी परदेशी ,माजी सरपंच मोतीराम पा तोरणे , परसराम तोरणे ,विलास सांगवे ,जानकीराम तोरणे , नरसिंग पंदलवाड , सुंदरसिंग जाधव, गजानन चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

मी “एकनाथ” पवार राज्याचे मुख्यमंत्री “एकनाथ” शिंदे व उमरज मठाचे मठाधिपती संत “एकनाथ” नामदेव महाराज असून हे तीनही “एकनाथ” उमरज वाशियांसोबत असताना उमरज सह पंचक्रोशीतील गावांना निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही या तीनही एकनाथांच्या वतीने देत असल्याचे “एकनाथ” दादा पवार यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.